नाशिक : मालेगाव–मनमाड महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी असून 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे.
भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
या भीषण अपघातात चार प्रवाशांचा जागीच करुण अंत झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय ट्रॅव्हल्समधील 20हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबवण्यात आलं. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मालेगाव–मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मृतांची नावं
मृतांमध्ये मालेगाव येथील शेख अताऊर रहेमान शेख आबिद (वय 39, रा. इस्लामपुरा), सत्तार खान मोहम्मद खान (वय 39, रा. प्लॉट नं. 4, अमनपुरा) आणि याकुब शेरू खान (वय 27, रा. अमनपुरा) यांचा समावेश आहे. ट्रॅव्हल्स बसमधील मृत 26 वर्षीय तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
नवा बोगदा हायवेवरून मुंबईला जोडणार
इंदिरानगर बोगद्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आल्याने या महिनाअखेरपर्यंत तेथील वाहतूक कोंडी टळण्याची शक्यता असताना, आता द्वारकाजवळील ‘ग्रेड-सेपरेटर’च्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मुंबई-आग्रा महामार्गावरील पुढील टप्प्यात उद्भवण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी होणार असून, नागरिकांना आणखी काही महिने अडचणींचा सामना करावा लागेल.











