काल परवा हाती आलेल्या भारतीय सैन्यदलाच्या निकालात सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील माऊली करिअर अकॅडमीच्या एकूण 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून त्यांची लष्करी सेवेत निवड झाली आहे.
यामध्ये अथर्व माने, करण जाधव, विराज शिंदे, प्रतीक घोलप, सुशांत चव्हाण, प्रशांत कट्ट्मणी, शिवराज चव्हाण, विश्वजीत कदम, प्रथमेश मोरे, सुरज संकपाळ, मिलिंद निकम यांनी यश संपादन केले आहे.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलेही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतात हे यातून दिसून आले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना सुद्धा कधी जिद्द हरली नाही. काहीतरी करायचे, करून दाखवायचे आहे या उद्देशाने नेहमी कष्ट घेत राहिले. या सर्व प्रक्रियेत पहिल्यांदा परीक्षा झाली व त्यानंतर मैदानी व शारीरिक चाचणी होती. दिवस दिवसभर बसून अभ्यास करणे व पहाटे लवकर उठून मैदानी चाचणीची तयारी करणे यासाठी अतोनात कष्ट घ्यावे लागतात. पण साताऱ्याच्या मातीत जन्मलेला हा युवक माघार घेईल तर मग तो सातारचा युवक कसला आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने कधीही माघार घेतली नाही असे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाचे पाठबळ लाभले आहे. विशेषतः माऊली करिअर अकॅडमी रहिमतपूर चे सर्वेसर्वा विजय कदम सर यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले असे या लोकांनी सांगितले. विजय कदम सरांचे विशेष म्हणजे ते अनाथ मुले व गरजू विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. यातील काही विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत मार्गदर्शन केले होते असे विद्यार्थ्यांच्या म्हणण्यातून आले. तसेच विद्यार्थ्यांच्या म्हणण्यातून असे आले की सरांनी आम्हाला शून्यातून निर्माण केले आहे. एकाच वेळी ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीतील या 11 विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे पंचक्रोशीत याबद्दल चर्चा होत आहे. तसेच या सर्वांचे व त्यांचे मार्गदर्शक विजय कदम सरांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.











