April 23, 2026 4:58 pm

भरकटती तरुण पिढी आणि हरवते संस्कार; पाचगणीत राहुल गिरी यांचे ठोस भाष्य

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पाचगणी प्रतिनिधी : प्रमोद रांजणे 

आजच्या काळात शिक्षणासाठी शहराकडे जाणारी तरुणांची पावले जर ग्रंथालयाकडे न जाता मद्यालयाकडे वळत असतील, तर ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे परखड प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांनी केले. बुडत्याला तारण्याचे सामर्थ्य ज्याच्यात असते तोच खरा तरुण असतो, असे सांगत त्यांनी आजच्या तरुण पिढीच्या भरकटत्या वाटचालीवर कडाडून टीका केली. महाबळेश्वर येथील मीनलबेन मेहता कॉलेजच्या वतीने आयोजित ‘डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमाले’त दुसरे पुष्प गुंफताना गिरी हे ‘महापुरुष आणि आजची तरुण पिढी’ या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी बदलती जीवनशैली आणि मोबाईल संस्कृतीवर तीव्र शब्दांत भाष्य केले. कोरोना काळानंतर पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चालला असून मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढी विषारी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालक आपल्या मुलांना महागडे मोबाईल देतात, मात्र छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांचे चरित्र वाचायला देत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महापुरुषांचे विचार जोपर्यंत तरुण वाचणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्यात स्वकर्तृत्वाने उभे राहण्याची जिद्द निर्माण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वामी विवेकानंद, महात्मा फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील उदाहरणे देत त्यांनी सांगितले की, आपली भूमी ही त्यागाची परंपरा असलेली आहे. मात्र आजची पिढी विलासी आणि भोगी जीवनाकडे का झुकत आहे, याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आजची मुले नट-नट्यांचे सेल्फी जपून ठेवतात, पण स्वतःच्या आईसोबत सेल्फी काढण्याची इच्छा दाखवत नाहीत, ही शोकांतिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. आईच्या संस्कारांची ताकद इतकी प्रबळ असावी की आई दूर असली तरी तिचे शब्द लेकराला दिशा देतील, असे सांगत शिवाजी महाराजांनी आईला ‘माँसाहेब’ का म्हटले, याचे महत्त्व त्यांनी उलगडून सांगितले.

तसेच स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील प्रसंगातून आजच्या तरुणांनी काय शिकावे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश देसाई यांनी केले. स्वागताध्यक्ष डॉ. मिलिंद हुजरे यांनी महाविद्यालयाच्या या वैचारिक उपक्रमाचे कौतुक केले. तर व्याख्यानाच्या शेवटी संतोष कवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या व्याख्यानाला पाचगणी परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!