डॉ. नितीन सावंतांच्या भाजप प्रवेशाने वाईच्या राजकारणात मोठी खळबळ
वाई प्रतिनिधी | प्रशांत थोरवे
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून वाई–खंडाळा–महाबळेश्वर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रमुख नेते डॉ. नितीन सावंत यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. सावंत यांना ‘पवार कुटुंबाचे डोळे आणि कान’ म्हणून ओळखले जात होते. मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत गटबाजी, कुरघोड्यांचे राजकारण आणि कामात येणारे अडथळे यामुळे ते अस्वस्थ होते. अखेर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
डॉ. सावंत यांच्यासोबत वाई शहराध्यक्ष संतोष शिंदे यांनीही यापूर्वी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची स्थानिक संघटनात्मक घडी विस्कटली आहे. दुसरीकडे भाजपला या प्रवेशामुळे अनुभवी नेतृत्व आणि मजबूत मतदारसंघीय संपर्क असलेली ‘रेडिमेड’ ताकद मिळाली आहे.
दरम्यान, “निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा दिखावूपणा करणाऱ्यांना महत्त्व दिले जात आहे,” असा सूर सावंत समर्थकांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासमोर नवीन नेतृत्व उभे करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ना. मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वाई मतदारसंघात भाजपने डॉ. सावंतांच्या माध्यमातून थेट ‘होम ग्राऊंड’वर घुसखोरी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चौकट | डॉ. नितीन सावंत यांचे स्पष्टीकरण
“मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांची संथ गती पाहता, सत्ताधारी पक्षासोबत राहूनच जनतेची कामे अधिक प्रभावीपणे करता येतील, असा माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेतृत्व ज्या गतीने विकास करत आहे, त्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय मी घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर माझा पूर्ण विश्वास आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि तरुणांना न्याय देण्यासाठी भाजप हा सक्षम पर्याय आहे. सहकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे.”
— डॉ. नितीन सावंत











