प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन केल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर मराठवाड्यातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. बच्चू कडू यांनी पक्ष विकून शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक होती,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. लोभापायी काही जण गेले असले तरी कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा आनंद असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
“आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलवून मंत्री केला ही माझी चूक झाली. लोभापायी जे गेले त्यांना जाऊ द्या, लढणारे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, याचा मला आनंद आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंधे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली,” अशी टीकाही यापूर्वी करण्यात आली होती.
दरम्यान, आपण कोणत्या मंत्रिपदासाठी किंवा पदरात काही पाडून घेण्यासाठी शिवसेनेत गेलो नाही असं बच्चू कडू म्हणाले होते. जर मला काही मागायचे असते, तर मी गुवाहाटीला गेल्यावरच मागितले असते. मी पदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी भांडलो आहे, असं बच्चू कडू म्हणाले होते.
दरम्यान, प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी आपण कोणत्याही पदासाठी शिवसेनेत गेलो नसल्याचे स्पष्ट केले होते. दिव्यांग मंत्रालयासाठी लढा दिला असून सत्तेसाठी भूमिका बदललेली नसल्याचा दावा त्यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. नंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते शिंदे गटासोबत गेले आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करत विधान परिषदेची आमदारकी स्वीकारली.











