June 5, 2026 7:31 pm

पुण्यात आचारसंहिता सुरू महापालिकेने पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे कामे रखडणार आहेत. त्यामुळे या काळात महापालिकेची स्थायी समितीची बैठक घेता येईल का? याबाबत पुणे महापालिकेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे.

महापालिकेच्या नगरसचिव योगिता भोसले यांनी याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधीतून निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभेसह विविध विशेष समित्यांचे कामकाज बंद झाले आहे. आचारसंहिता सुरु झाल्याने महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे याबाबत स्पष्टता द्यावी, असे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्थायी समितीची बैठक महिन्यातून एकदा घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबींवरील निर्णय देखील या समितीमार्फत घेतले जातात. गुरुवारी (२१ मे ) स्थायी समितीची पूर्वनियोजित बैठक होती. मात्र आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन महिन्यांमध्ये शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. यासाठी काही कामे करणे आवश्यक आहेत. तसेच शहरात पावसाळ्यापूर्वीची कामे, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचण्याच्या समस्या आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नाले सफाईची कामे देखील करणे आवश्यक आहे, असे महापालिकेने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमित बैठका आवश्यकतेनुसार संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने घेता येतात. त्यामुळे केवळ अत्यावश्यक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची बैठक घेता येईल का? तसेच त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबावी, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्याची विनंती महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यावर काय प्रतिसाद दिला जाणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, शहरात पावसाळापूर्वीची कामे करणे आवश्यक आहेत. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण होणे गरजेची आहेत. पालखी सोहळा शहरात येत असल्याने अनेक कामांसाठी मंजुरी देणे आवश्यक आहे. आचारसंहिता लागू झाल्याने अडचणी येत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाने पत्र पाठविले असून आचारसंहितेच्या काळात कोणते निर्णय घेता येतील, याबाबत मार्गदर्शन मागविले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!