मागील काही दिवसांपासून पुण्यात गँगवॉरच्या घटनांची मालिका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची दीड वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येत सोम्या गायकवाड आणि कोमकर गँगचा हात असल्याचा आरोप आहे.
वनराजच्या हत्येनंतर या दोन्ही टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. आंदेकर टोळीकडून या वनराजच्या हत्येचा बदला घेतला जात आहे. मुख्य आरोपी तुरुंगात असल्याने आंदेकर टोळीकडून आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट केलं जात आहे.
काही दिवासांपूर्वी आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरची हत्या केली. यानंतर दुसरा एक आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेला देखील संपवलं. आता बुधवारी आकाश म्हस्केचा भाऊ अक्षय म्हस्केवर देखील हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर पुण्यातील गँगवॉरनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याचे महत्त्वाचे साथीदार सर्वजण तुरुंगात आहेत. तरीही बाहेर वनराजच्या हत्येचा बदला घेतला जात आहे. एकामागून एक हत्या घडवल्या जात आहे.
या सर्व हत्येच्या मालिकांबाबत आत बंडू आंदेकरच्या कन्या आणि गणेश कोमकरच्या पत्नी कल्याणी कोमकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडू आंदेकर तुरुंगात राहून कशाप्रकारे बदला घेत आहे? याचा खुलासा देखील कल्याणी कोमकर यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.
गँगवॉरमधून घडणाऱ्या घटनांकडे पोलिसांनी लक्ष द्यावं. बंडू आंदेकर टोळीचे जेलमधून देखील फोन कॉल सुरू आहेत. ते जेलमध्ये बसून बाहेरच्या लोकांशी एक-एक तास मिटींग घेतात. यातून प्लॅनिंग करून निष्पाप लोकांना टार्गेट केलं जात आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. त्यांना बाहेर कुणाशी बोलताच यायला नाही पाहिजे. बंडू आंदेकरांनी केलेले आधीचे कर्मच आता त्यांच्याकडे परत आले आहेत, हे त्यांना कसं कळत नाही, अजून लोकांचे जीव घेऊन त्यांचा मुलगा परत येणार आहे का? असा सवाल कल्याणी कोमकर यांनी विचारला.
“त्यांच्या मुलाला म्हणजेच माझ्या भावाला त्यांच्या शत्रूंनी मारलंय. कारण त्यांनी आधी त्यांच्या माणसाला मारलं होतं, म्हणून त्यांनी यांच्या मुलाचा मर्डर केला. पण त्यांनी आम्हाला यात गोवलं, आम्ही काही केलं असतं, तर आम्ही इकडं राहिलोच नसतो, आता माझ्यासोबत फक्त लहान सहा मुलं आहेत,” असंही कल्याणी कोमकर म्हणाल्या.
आंदेकर जेलमध्ये बसून हे हत्या घडवत आहेत? याची माहिती त्यांना कशी मिळतेय? याबाबत विचारलं असता कल्याणी कोमकर पुढे म्हणाल्या, “काही लोक माझ्याजवळ निरोप पोहोचवतात. पण आम्ही त्यांची नावं नाही सांगू शकतं. आम्हाला ही माहिती जेलमधून नाही, पण आम्हाला काही लोक भेटून सांगतात. आंदेकर ज्यांच्याशी मिटींग करतात, त्यातील काही लोक आमच्या बाजुने असतील, ते लोकही आम्हाला अशी माहिती देतात, आम्हाला त्यांची नावं माहीत नाही, पण ते आम्हाला सांगतात. हे सगळं फोनवरून ठरतं, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे,” अशी मागणीही बंडू आंदेकरची मुलगी कल्याणी यांनी केली.











