पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आरपीआय आठवले गटाच्या अनिल मोरे यांच्या हत्येची घटना ताजी असताना ठाण्यातही आणखी एका नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशोक कांबळे यांची हत्या करण्यात आली. कोयता आणि लोखंडी सळईने मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. ४५ वर्षीय अशोक कांबळेंच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अशोक कांबळे यांच्यावर ८ मे रोजी जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु १९ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन कोकणे याला अटक केली आहे. आता पोलीस त्याचा मुलगा आकाशचा शोध घेताहेत.
अशोक कांबळे हे आरपीआयच्या ठाणे जिल्हा युवक आघाडीच्या महासचिवपदी कार्यरत होते. ते वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात पत्नी अर्चना(३६), मुलगी सिद्धी (११) आणि माही (९) यांच्यासोबत राहत होते. आरोपी देखील याच परिसरात राहायला होते.
१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत आकाश हा महिला नाचत असलेल्या ठिकाणी शिरत होता. त्यामुळे कांबळेंनी त्याला हटकलं. यावरून आकाशने त्याला धमकी दिली होती.
काही दिवसांनी ८ मेच्या दिवशी परिसरात हळदीच्या कार्यक्रमात अशोक कांबळे सहभागी झाले होते. अर्जुन आणि आकाश या दोघांनी हळदीच्या कार्यक्रमापासून काही मीटर अंतरावर बेदम मारहाण करण्यात सुरुवात केली. कांबळे यांची बायको घटनास्थळी पोहोचली. त्याचवेळी आकाश हा अशोक कांबळे यांच्यावर कोयत्याने वार करत होता. तर ५० वर्षीय अर्जुन हा सळईने मारहाण करत होता.
दोघांनी केलेल्या हल्ल्यात अशोक यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक कांबळे यांच्या मृत्यूनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरलं आहे.











