June 5, 2026 11:31 am

पुण्यात उन्हाबरोबर ‘धुळी’नेही जडतायत गंभीर आजार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सध्या उन्हाचा पारा वाढलेला असतानाच, पुण्यात ‘धुळीचे’ गंभीर संकट पुणेकरांसमोर उभे ठाकले आहे. विविध विकासकामांसाठी शहरात सुरू असलेल्या खोदकामामुळे हवेत धुळीचे कण मिसळतात. याचा थेट फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत असून, गेल्या दोन-तीन महिन्यांत श्वसन आणि डोळ्यांच्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढल्याचे निरिक्षण डॉक्टर नोंदवतात.

तर, हे आजार नेहमीप्रमाणे पाच-सहा दिवसात बरे होत नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.शहरात भूमिगत वाहिन्या, गटारांच्या कामांसाठी सुरू असलेल्या खोदकामांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आक्रसत आहेत. रस्त्यांच्या कडेला, अधे-मधे कुठेही पडलेला बांधकाम साहित्याचा ढीग, राडारोडा, सतत उडणारी धूळ आणि खोदलेले रस्ते नीट बुजविण्यात येत नसल्याने वाहतूक कोंडीतही भर पडत आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागांत भूमिगत जलवाहिन्या, सांडपाण्याच्या वाहिन्या, वीजवाहिन्या, दूरसंचार वाहिन्या, तसेच अन्य कामांसाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. पण, नियोजन न करता खोदण्यात येत असलेल्या रस्त्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. या कामांमुळे निर्माण झालेला राडारोडा रस्त्यांच्या कडेला, अधे-मधे कुठेही पडलेला दिसतो. त्यामुळे आधीच अरुंद रस्ते आणखी आक्रसतात. काम संपल्यानंतर रस्ता मूळ स्थितीत आणण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाची असते. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी केवळ माती, सिमेंट आणि खडी भरून अर्धवट काम केले जाते. त्यामुळे रस्त्याची उंची असमान होणे, खड्डे पडणे, दुचाकी घसरून अपघात होणे अशा शक्यता बळावतात.

पायाभूत सुविधांसाठी विकासकामे करताना काही प्रमाणात अडचणींशी जुळवून घेणे ठीक. पण, एकूण नियोजनाचे काय, रस्ते खोदताना कंत्राटदार नियमांचे पालन करतात का, त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाची, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

‘रस्त्यांवर सुरू असलेले खोदकाम, बांधकामांमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यात वाहनांचा धूर मिसळतो आणि हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होतो. श्वसन विकारांत यामुळे वाढ झाली आहे. आता ऊन आणि धुळीमुळे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, रांजणवाडी आणि डोळे येण्याचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांना या त्रासाला सामोरे जावे लागते,’ असे निरीक्षण डॉ. अविनाश भोंडवे यांनी नोंदवले. पूर्वी पाच-सहा दिवस औषधे घेऊन रुग्ण बरे व्हायचे. आता मात्र हे आजार लवकर बरे होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!