May 14, 2026 10:26 am

तुळापूर फाटा परिसरात भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वारंवार होणाऱ्या टँकर अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप, कठोर कारवाईची मागणी

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील तुळापूर फाटा परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका ४७ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शहरात वाढत्या टँकर अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दत्तात्रेय मोहन पंडित (रा. उरळी कांचन, ता. हवेली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दत्तात्रेय पंडित हे आपल्या दुचाकीवरून तुळापूर फाटा परिसरातून जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पंडित गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार घडणाऱ्या टँकर अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताचे चुलतभाऊ रविराज हनुमंत पंडित (वय २६) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून टँकर अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी वानवडी भागात एका अभियंता तरुणीचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. तसेच महम्मदवाडी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाचा आणि बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर एका हॉटेल व्यावसायिकाचाही अशाच प्रकारच्या अपघातात जीव गेला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने टँकर चालक आणि मालकांची बैठक घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वेगमर्यादा पाळणे, निष्काळजीपणे वाहन न चालवणे आणि वाहन चालवताना सुरक्षिततेचे नियम पाळणे याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे भरधाव टँकर चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शहरातील धोकादायक टँकर वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणीही पुढे येत आहे. वाढत्या अपघातांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!