May 13, 2026 11:15 pm

एपीएमसीत जांभळे अमाप; दरात घसरण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

उन्हाळ्याच्या अखेरीस बाजारात दाखल होणाऱ्या जांभळांनी वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) फळ बाजारात रंगत आणली आहे. कोकण आणि महाराष्ट्र-गोवा सीमेलगतच्या भागांतून जांभळांची आवक बाजारात वाढू लागल्याने दरही काहीसे कमी झाले असून, पुढील काही दिवसांत स्थानिक भागातील जांभळे बाजारात येऊ लागल्यानंतर दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या सिंधुदुर्ग जिल्ल्यासह कोकण पट्ट्यातील गावांमधून जांभळांचा पुरवठा एपीएमसी फळ बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुरुवारी बाजारात सुमारे २० क्विटल जांभळांची आवक झाली. सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलो दर २५० ते ३५० रुपयांदरम्यान आहेत. याआधी २८ एप्रिल रोजी हेच दर ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो होते.

तर चांगल्या प्रतीच्या जांभळांसाठी ४५०-५५० रुपये प्रतिकिलो प्रमाणे दर मोजावे लागत आहेत. सध्या, दरदिवशी जांभळाच्या १-२ गाड्या फळ बाजारात दाखल होत आहेत. येत्या १० ते १५ दिवसांत अंबरनाथ, बदलापूर, खोपोली आणि कर्जत परिसरातील जांभळे बाजारात येतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे पुरवठा वाढण्याची शक्यता आहे.

“मागील १०-१५ दिवसांपासून कमी-जास्त प्रमाणात जांभळे बाजारात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दरातही चढ-उतार पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत आवक वाढून दर कमी होण्याची शक्यता आहे,” असे फळ बाजारातील व्यापारी संजय पिंपळे यांनी सांगितले.

जांभळाच्या हंगामामुळे कोकण आणि डोंगराळ भागातील अनेक कुटुंबांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. जंगल परिसरातून जांभळांचे संकलन करून ते मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आणले जातात, काही ठिकाणी महिला बचत गर्दाकडून जांभळावर प्रक्रिया करून सरबत, जेंग आणि पावडर तयार करण्याचे कामही केले जाते. त्यामुळे जांभळाचा हंगाम हा केवळ फळ बाजारापुरता मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही हातभार लागत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!