May 14, 2026 3:46 pm

पायधुनी कलिंगड प्रकरणातील धागेदोरे अखेर सापडले? समोर आली मोठी अपडेट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने या चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.

मात्र, या चौघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असून ही बाधा कशामुळे झाली, याचा तपास सुरू आहे. अशातच आता या चौघांच्या मृत्यूबाबत नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील गूढ उलगडणार की आणखी वाढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून तपास सुरू असतानाच, या रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळण्यास सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक चर्चेतून ही बाब स्पष्ट झाली असून, हा विलंबच त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेच्या दिवशी कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबातील सर्वांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेतल्यावर त्यांना काही काळ बरे वाटले. मात्र, त्यानंतर प्रकृती पुन्हा खालावली. वैद्यकीय शास्त्रानुसार, अशा आपत्कालीन स्थितीत ‘गोल्डन अवर’ (अतिशय महत्त्वाचा काळ) मध्ये उपचार मिळणे अनिवार्य असते. मात्र, प्रकृती गंभीर असतानाही रुग्णालयात जाण्याऐवजी कुटुंब घरीच थांबले. अखेर प्रकृती हाताबाहेर गेल्यावर त्यांना ‘जेजे’ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता.

फॉरेन्सिक विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, हा प्रकार ‘तीव्र विषबाधा’ (Severe Poisoning) असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली? कलिंगडात काही घातक अंश होते की अन्य काही कारण होते? याचे गूढ अद्याप कायम आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) सध्या या कलिंगडाचे नमुने तपासत असून त्यांचा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, अजूनही फॉरेन्सिक अहवाल समोर आला नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. या चौघांना नेमकी विषबाधा कशामुळे झाली, कोणता घटक जीवघेणा ठरला, याचा तपासही सुरू राहणार आहे.

पोलीस आता त्या स्थानिक डॉक्टरांचीही चौकशी करणार आहेत, ज्यांनी सुरुवातीला प्राथमिक उपचार केले होते. डॉक्टरांनी रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला होता का? आणि साडेपाच तास नेमके काय घडले? या प्रश्नांच्या उत्तरावरच या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष अवलंबून असेल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!