May 14, 2026 9:33 pm

नसरापूर हादरले : चिमुकलीवरील अत्याचारानंतर हत्या; सीसीटीव्ही तपासातून आरोपीचा माग काढला, ग्रामस्थांचा संताप उसळला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नसरापूर परिसरात काल दुपारी घडलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढल्याची माहिती समोर आली आहे.

मयत चिमुकली वेदू ही सुट्टीनिमित्त आपल्या आजीकडे आली होती. साळवडे गावातील आरोपी भिवाजी कांबळे (वय ६५) याने तिला फूस लावून गायवळ यांच्या गोठ्यात नेले. तेथे त्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर चिमुकलीचा शोध सुरू असताना स्थानिक नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या फुटेजमध्ये संबंधित आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना दिसल्याचे सांगितले जाते. यानंतर नागरिकांनी आरोपीचा शोध सुरू केला असता तो नसरापूरमधील काळुबाई मंदिर परिसरात बसलेला आढळून आला.

स्थानिकांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. काही वेळातच गायवळ यांच्या गोठ्यात त्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आणि ही घटना उघडकीस येताच नागरिकांचा संताप अनावर झाला.

या घटनेनंतर आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र जमले. पोलिसांकडून सुरुवातीला मिळालेल्या प्रतिसादाबाबत नाराजी व्यक्त करत नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर चेलाडी येथील पुणे–सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे एक ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून नसरापूर ग्रामपंचायतीचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. जर हे कॅमेरे कार्यरत असते, तर आरोपीचा माग अधिक लवकर लागू शकला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या निष्काळजीपणाबद्दल ग्रामपंचायतीविरोधातही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आरोपीविरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या घटनेच्या निषेधार्थ आज नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत असून भैरवनाथ मंदिर ते चेलाडी चौक दरम्यान निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “वेदूला न्याय मिळालाच पाहिजे” अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज अधोरेखित होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!