मालवली (ता. —) : तब्बल २१ वर्षांनंतर मालवली गावातील ऐतिहासिक विहिरीतील गाळ काढण्याचे अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक काम सरपंच सुनिल शेंडकर यांच्या पुढाकारातून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, विहिरीच्या पुनरुज्जीवनामुळे भविष्यात पाणीटंचाईवरही मोठा दिलासा मिळणार आहे.
सदर विहीर सुमारे ५० फूट खोल असून त्यात ३० फूट पाणी साचलेले होते. २००५ साली शेवटचा गाळ काढण्यात आला होता. त्यानंतर गावात नळपाणी योजना सुरू झाल्यामुळे या विहिरीकडे दुर्लक्ष झाले. गेल्या चार ते पाच वर्षांपासून विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली होती, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.
गाळ काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विहिरीत विषारी वायू असण्याची शक्यता, शेवाळामुळे घसरडे झालेले पृष्ठभाग, पाण्यात विजेचा प्रवाह जाण्याचा धोका, तसेच सतत खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक संकटांवर मात करत हे काम पार पाडण्यात आले.
या कामात काही ग्रामस्थांनी प्रामाणिकपणे मदत केली असली तरी अनेक जण केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचेही चित्र दिसून आले. तरीही सर्व अडथळे पार करत सरपंच शेंडकर यांनी स्वतः पुढाकार घेत काम पूर्ण केले.
विशेष म्हणजे, २०१७ साली वैयक्तिक दुःखाच्या काळातही त्यांनी गावातील विहिरीचा गाळ काढण्याचे काम केले होते. गावाबद्दलची त्यांची निष्ठा आणि बांधिलकी पुन्हा एकदा या उपक्रमातून दिसून आली.
या विहिरीत सध्या ३ ते ४ कासवे सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. मोठे, मध्यम आणि लहान आकारातील कासवे विहिरीच्या कपारीत सुरक्षितपणे वास्तव्य करत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
सरपंच शेंडकर यांनी आतापर्यंत गावात मोटर दुरुस्ती, विहिरीची साफसफाई, उंबराचे झाड संवर्धन, ग्रामपंचायत शेड बांधकाम, व्होटा निर्मिती आणि रंगकाम अशी विविध कामे पूर्ण केली आहेत. “माझे काम हाच माझा परिचय” असे सांगत त्यांनी पुढेही गावासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमामुळे मालवली गावातील नागरिकांकडून सरपंचांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.











