April 23, 2026 3:34 pm

*थकीत वेतनासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरातील कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या घंटागाड्या 14 दिवसांपासून ठप्प असल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले. दुर्गंधी, डास-माश्यांची वाढ आणि संभाव्य साथींचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्वच्छता काम पाहणाऱ्या एजन्सीचे महापालिकेकडील देयक थकल्याने चालक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे 4 ते 5 महिन्यांचे वेतन रखडले. संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.11) महापालिकेच्या कार्यालयात जाऊन वेतन तत्काळ अदा करण्याची मागणी करत निदर्शने केली.

महापालिकेकडून संबंधित घंटागाडी एजन्सीचे तब्बल 15 ते 16 महिन्यांचे देयक अदा झाले नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या आर्थिक अडचणीमुळे एजन्सीने वेतन वितरण थांबविल्याचे सांगण्यात येते. चार-पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याची व्यथा व्यक्त होत आहे.

9 फेब्रुवारी रोजी तसेच त्यापूर्वीही एकदा लेखी निवेदन देऊन वेतनाची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला. आम्ही आधी शहराचे नागरिक आणि नंतर स्वच्छता कर्मचारी आहोत. अनेक वर्षे लोकांच्या घरातील कचरा, रस्त्यांवरील प्लास्टिक व इतर घाण उचलून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम प्रामाणिकपणे केले. मात्र आमचेच वेतन थकवून प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

दररोज शेकडो टन कचरा निर्माण होणाऱ्या शहरात नियमित संकलन बंद असल्याने अनेक भागांत कचरा रस्त्यावर साचत आहे. उघड्यावर पडलेला ओला कचरा कुजत असून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भागांत नागरिकांनी स्वखर्चाने कचरा हलविण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसले.

निवेदनावर सय्यद हैदर, श्याम शिंदे, सय्यद सरफराज, सतीश गोरे, शेख निसार, विजय जाधव, जावेद खान, कैलास वाव्हळे, किशोर पाचपूजे, शेख सलीम, मिर अली, शेख फेरोज, नागेश गायकवाड, प्रकाश पाचपुंजे, शेख इरफान, संतोष खंदारे, योगेश ठाकूर, राजेश भराडे आदीं स्वाक्षऱ्या आहेत. वेतन तातडीने न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीतसाठी मनपा प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

आयुक्तांच्या वक्तव्याचा व्हिडिओ चर्चेत

काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळाला माझाही पाच महिन्यांपासून पगार झालेला नाही, मीही त्रस्त असून परभणी सोडण्याच्या तयारीत आहे, असे उत्तर दिल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!