भरधाव वेगातील इनोव्हा मोटारीच्या धडकेने रस्त्यावरील चार रिक्षांसह एका दुचाकीचे नुकसान झाले तसेच घराची भिंतही कोसळून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही.
शहरातील नीलक्रांती चौक ते बालिकाश्रम रास्ता यादरम्यानच्या बालिकाश्रम शाळेजवळ हा अपघात मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास घडला. नागरिकांनी पाठलाग करून ईनोवा चालकास पकडून व त्याला तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचे नाव झाल्याचे तोफखाना पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. या संदर्भात रिक्षाचालक गणेश जगन्नाथ कोकणे वय (वय ४३, रा. बालिकाश्रम शाळेजवळ यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.
गणेश कोकणे व इतर चालकांनी नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर रस्त्यावर रिक्षा व दुचाकी वाहने लावले होते. मध्यरात्री सव्वा दोन ते अडीचच्या सुमारास जोराचा, कोसळलल्याचा आवाज आल्याने कोकणे जागे झाले. त्यावेळी ते कुटुंबासह घरातच झोपलेले होते. त्यांनी पाहिले असता त्यांच्या घराचा लाकडी दरवाजा तुटून, घराची भिंत कोसळली होती. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता राखाडी रंगाच्या इनोव्हाचा (एमएच २० बीटी १०११) चालक हा घराबाहेर लावलेल्या वाहनांना धडक देऊन वेगाने निलक्रांती चौकाकडून बालिकाश्रम रास्त्याने निघून जाताना दिसला.
या अपघातात गणेश कोकणे यांची रिक्षा व दुचाकी तसेच इतर तिघांच्या रिक्षांचे नुकसान झाले तसेच कोकणी यांच्या संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले. यापूर्वीही शहरातील पाईपलाईन रस्ता व तपोवन रस्ता भागात ‘हीट अँड रन’च्या घटना घडलेल्या आहेत. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून सध्या शहरात वाहन तपासणीची मोहीम सुरू असली तरी अशाही घटना सुरूच आहेत.
लहान मुलांच्या हातात मोठ्या वाहनांच्या किल्ल्या पालकांकडून सर्रासपणे दिल्या जातात. त्यातून असे अपघात घडतात. शहरातील विविध महाविद्यालयांच्या रस्त्यांवर भरधाव मोटरसायकली चालवण्याचे प्रमाणही वाढले आहे. मध्यंतरी पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली. कर्णकर कश्य आवाजातील मोटरसायकलींचे सायलेन्सर बुलडोझर खाली फोडण्याची कारवाई करण्यात आली महाविद्यालयांच्या परिसरातील छेडछाडीला आळा घालण्यासाठी शहरात स्वतंत्र निर्भया पथक नियुक्त करण्यात आले. या पथकानेही कारवाया केल्या. मात्र त्याला पायबंद बसलेला नाही.
नुकत्याच झालेल्या महापौर निवडीच्या सभेतही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.











