April 24, 2026 1:33 am

*यवतमाळात उच्चभ्रू वस्तीत पोलिसांचे छापे!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहराच्या शांततेला गालबोट लावणाऱ्या आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये फोफावलेल्या देहविक्रयाच्या ‘काळ्या बाजारावर’ पोलिसांनी शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दुपारी छापा टाकला.

वाघापूर नाका आणि लोहारा परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखाण्यांमुळे परिसरातील सामान्य जनता त्रस्त झाली होती.

शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या वाघापूर नाका ते पिंपळगाव रोडवरील ‘समर्पण अपार्टमेंट’ मधील फ्लॅट नंबर ०२ मध्ये गेल्या काही दिवसांपासून देहविक्रयाचा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला.

पोलिसांनी या अड्ड्यावर एका बनावट ग्राहकाला पाठवून व्यवहाराची खात्री केली. ग्राहकाने इशारा करताच, दबा धरून बसलेल्या डी.बी. पथकाने फ्लॅटवर झडप घातली. या कारवाईत कुंटणखाना चालवणारी मुख्य महिला सूत्रधार आणि तिचा जोडीदार अंकुश रामभाऊ कडू (४०, रा. भेंडाळा, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली. या ठिकाणाहून पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून, तिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

दरम्यान शनिवारी लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभव नगर परिसरात एका राहत्या घरी सुरू असलेल्या कुंटणखण्यावर लोहारा पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एका महिला आरोपीसह एका पुरुष आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या छाप्यातही पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात ‘पिटा’ ॲक्ट अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यवतमाळ शहर आणि परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या लॉजिंग-बोर्डिंग, फ्लॅट्स आणि राहत्या घरांमधील अनैतिक धंद्यांची यादी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या, तसेच तरुण पिढीला चुकीच्या मार्गाला लावणाऱ्या अशा अनैतिक धंद्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये समाधान

उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये कुटुंबासह राहणाऱ्या नागरिकांना या प्रकारांमुळे मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. समर्पण अपार्टमेंट आणि वैभव नगरमधील या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यवतमाळ पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे धागेदोरे कोठपर्यंत आहेत? या व्यवसायामागे एखादी मोठी टोळी सक्रिय आहे का? आणि संभाजीनगरचा आरोपी यवतमाळमध्ये हे रॅकेट कसे चालवत होता? या दिशेने आता यवतमाळ पोलीस कसून तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!