शंकरनगर (विंचूर) येथील प्राथमिक आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अश्विनी आनंद राठोड (वय १५) हिने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
मयत अश्विनीचे वडील आनंद गंगाराम राठोड हे मजुरी करतात. सोमवारी अश्विनीचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. सोमवारी सकाळी अश्विनी व तिची लहान बहीण शाळेला गेल्या होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास लहान बहिणीसोबत अश्विनी घरी आली.
त्यानंतर लहान बहीण घराबाहेर गेल्यावर अश्विनीने घरामागील खोलीच्या लोखंडी ॲंगलला गळफास घेतला. लहान बहीण घरी आल्यावर तिने पाहिले आणि कुटुंबियांनी ही बाब कळविली. त्यानंतर नातेवाईकांनी तिला खाली उतरवून तातडीने मंद्रुपच्या सरकारी रुग्णालयात नेले.
पण, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याची नोंद मंद्रुप पोलिसांत झाली असून अश्विनीने आत्महत्या का केली, याचा तपास सुरु असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितले.











