April 23, 2026 10:36 pm

*सांगलीत जगायचं असेल तर घाबरूनच रहा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

तुम्ही रस्त्यावरून सहज चालत निघालाय; चुकून कुणाला धक्का लागला, तरी वाद घालू नका. दुचाकीवरून जाताना कुणाला कट मारू नका. कुणाकडे प्रेमाने किंवा रागाने पाहू नका. एखादा चौक, शेत किंवा मोकळ्या जागेत गांजा ओढत बसलेला दिसला, तरी त्याला हटकू नका.

कारण तुम्हाला या शहरात जगायचे असेल, तर हेच नियम पाळावे लागतील. घाबरूनच राहावे लागेल; अन्यथा यापैकीच कुणीतरी तुमच्या पोटात गुप्ती खुपसण्याची किंवा डोक्यात दगड घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नशेखोरीची वाळवी सांगलीला लागली आहे. ती वेगाने शहराचं सामाजिक आरोग्य पोखरत आहे. त्यात सातत्याने बळी जात आहेत. ‘आपला नंबर लागू नये’ यासाठी घाबरून राहणं, हीच आता सांगलीकरांची मानसिकता बनली आहे.

उत्तर शिवाजीनगर परिसरात दुचाकीवरून जाताना चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून क्षणात छातीत कोयता वार करून खून करण्यात आला होता. ते प्रकरण सांगलीला सुन्न करून गेलं. मात्र, ते सत्र अद्याप संपलेलं नाही.

शनिवारी धामणी रस्त्यावर मोबाईल हरवला म्हणून शोधून घरी निघालेल्या व्यक्तीला डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आले. हल्लेखोर पूर्ण नशेत होते. सकाळी नशा उतरल्यावर त्यांनी विचारलं, ‘आम्ही काय केलंय?’

अशी टोळकी तुमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर गांजा फुंकत बसलेली असू शकतात किंवा तुम्ही रोज ज्या मार्गाने ये-जा करता, त्या चौकातच तळ ठोकून बसलेली असू शकतात. पोलिसांकडून ‘डार्क स्पॉट’वर लक्ष ठेवले आहे,’ असे सांगितले जाते.

असे २० ‘डार्क स्पॉट’ समोर आले आणि त्यावर चर्चा घडवून आणली. मात्र बहुतांश गंभीर घटना याच ठिकाणी घडताना दिसत आहेत. पोलिसांकडून कडक कारवाईची अपेक्षा आहेच; मात्र या भागांत सातत्यपूर्ण पेट्रोलिंग गरजेचे आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत वारंवार सूचना दिल्या असल्या, तरी त्याचा प्रभाव वाढवण्याची नितांत गरज आहे.

गुन्हेगारी टोकाला

सांगलीतील गुन्हेगारीने अक्षरशः कळस गाठला आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास एक शेतकरी मुलासह रस्त्याने जात असताना नशेखोरांनी कोयते नाचवत पिता-पुत्रांवर हल्ला चढवला. वडिलांचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी आहे.

परिसरातील नागरिकांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही या नशेखोरांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नव्हता. शहरातील अनेक भागांत असे ‘डार्क स्पॉट’ असून नशेखोरांचा धिंगाणा सुरू आहे. आठवडाभरापूर्वी वडर कॉलनी येथे मावा देण्याच्या वादातून चाकूने भोसकण्यात आले; त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.

शामरावनगर येथे रागाने पाहिल्याच्या कारणातून प्राणघातक हल्ला झाला. एका पाठोपाठ पाच गंभीर घटना घडल्याने सांगलीत प्रचंड घबराट पसरली आहे. पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याची भावना बळावत चालली असून नशेखोर बेधुंद झाले आहेत.

भीतीच्या छायेत शहर

सांगली शहरात फिरताना भीती वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गल्लोगल्ली नशेखोरांची दहशत वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा नेमकी कोणती ठोस कारवाई करणार, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

गुन्हेगारांचे आव्हान मोडून काढण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांचे नेटवर्क अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली आहे.

सामान्य नागरिकांना भीतीच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी कोणत्या सूचना दिल्या जातात आणि त्यांची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारभारी काय करणार? सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीत नशेखोरी हा प्रचाराचा केंद्रबिंदू होता. ‘सांगली सुरक्षित करणार’ अशी आश्वासने देण्यात आली होती.

भाजप सत्तेत आहे आणि तुल्यबळ विरोधी पक्षही आहेत. सारे मिळून भयमुक्त, नशामुक्त सांगलीसाठी कोणत्या ठोस उपाययोजना करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही पक्ष व संघटनांनी सुरू केलेल्या मोहिमा त्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत. पोलिसांनी आंदोलकांना विरोध करण्यापेक्षा मुद्द्यांवर काम करणे अपेक्षित आहे.

लोक शांत; पण…

विश्रामबागसारख्या भागांत नशेखोर कोयते घेऊन धुमाकूळ घालत आहेत. नागरिकांमधील संताप वाढत चालला आहे. पोलिसांची जबाबदारी या स्थितीत अधिक वाढली आहे. ‘लोकांनी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका,’ असा इशारा सामान्य नागरिक देत आहेत. शनिवारच्या घटनेत गुन्हेगारांना लोकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, हे त्याचेच द्योतक आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!