प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना भगत सिंह कोश्यारी यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करत अनेक विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली. “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते”, असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली होती. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही छोट्या मनाचे लोक एकप्रकारे विवाद निर्माण करत आहेत. मला कोणत्याही विवादात पडायचं नाही. पण काही लोकांच्या काळात काय काय घडलंय, कोणाला पद्मश्री मिळालाय हे सांगितलं तर ते आजच्या दिवसाचं औचित्य राहणार नाही. म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही.”
भगत सिंह कोश्यारी काय म्हणाले?
“माझी कोणी प्रशंसा करावी किंवा निंदा करावी म्हणून मी काम करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतामाता माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्यासाठी मी काम करत असतो आणि काम करत राहणार. हे काम करत असताना कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करणार?” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
संजय राऊतांनी काय टीका केली?
“महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान”, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली…











