राज्यात महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील कट्टर राजकीय विरोधक असलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी एकत्र येत घड्याळाच्या चिन्हावर समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर आज ( गुरूवारी, ता २२) माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) म्हणाले की, हर्षवर्धन पाटील आणि आमचं काही बांधाच भांडण नव्हतं. आमचे राजकीय मतभेद होते दोन्ही नेत्यांनी ठरवले एकत्र यायचं आणि त्याच्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढतो आहोत. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलाय. तर मुलगा श्रीराज भरणे यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यावरती देखील भरणे यांनी भाष्य केलेला आहे.
माझ्या मुलाचं नुकतंच कॉलेज संपलं आहे,तो नेहमीच समाजकार्यामध्ये भाग घेतो, लोकांना सहकार्य करतो, मोठमोठी शिबीरे भरवतो, ८ दिवसांपूर्वी त्याने दिव्यांगाचा वधू वर मेळावा आयोजित केला होता. त्याला निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्याने निवडणूक लढण्याच्या निर्णय घेतला आहे, त्याने फॉर्म भरला आहे, आजही तो कामासाठी बाहेर गेला असंही पुढे भरणेंनी म्हटलं आहे.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 114 व पंचायत समितीच्या 16 जागांसाठी 213 उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर अर्ज छाननी आणि माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे, असे असले तरी तालुक्यात खरी लढत ही घड्याळ विरुद्ध कमळ अशीच असणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी (बुधवारी ता.21) रोजी अखेरचा दिवस होता.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत असले, तरी या निवडणुकीत दोघांनीही जुने वाद बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली आणि ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंदापूरच्या राजकारणात महत्त्वाचा संदेश गेला आहे.
पुढील पिढीला राजकारणात संधी
या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील नेत्यांनी आपल्या पुढील पिढीला राजकारणात संधी देत दुसरी फळी पुढे आणली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी बावडा–लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून ‘घड्याळ’ चिन्हावर पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे यांनी वडापुरी–माळवाडी गटातून उमेदवारी दाखल केली आहे. तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी इंदापूर पंचायत समितीसाठी बोरी गणातून आपला अर्ज भरला आहे.
याशिवाय निमगाव केतकी–शेळगाव गटातून बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव, काटी–लाखेवाडी गटातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, पळसदेव–बिजवडी गटातून हर्षदा दीपक जाधव, बोरी–वालचंदनगर गटातून सागर मिसाळ, तर माळवाडी गणातून कल्पना विष्णू पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी नेत्यांसोबतच नव्या पिढीला संधी देत संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचे चित्र स्पष्ट होत असून, आगामी निवडणुकीत या नव्या समीकरणांचा निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











