मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीनं बहुमत मिळवल्यानंतर आता महापौरपदाचा पेच निर्माण झाला आहे. भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं २९ जागा जिंकल्या आहेत.
बहुमताचा ११४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेला सोबत घ्यावंच लागणार आहे. यामुळे शिवसेनेकडून अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी केली जात आहे. याशिवाय स्थायी आणि इतर समित्यांमध्येही स्थान मिळावं अशी मागणी असल्याचं म्हटलं जात आहे.
महापौरपदावरून भाजप आणि शिवसेनेत तणावाचं वातावरण निर्माण झालंय. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर असल्यानं अद्याप चर्चा झालेल्या नाहीत. दरम्यान, मुंबईच्या महापौरपदाबाबत दिल्लीतून भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांना महत्त्वाचा आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, मुंबईत भाजपचाच महापौर होईल असा स्पष्ट संदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवला आहे.
भाजपने मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौरपदावर आपलाच हक्क आहे हे मित्रपक्षांना सांगा असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने फडणवीस यांना दिला आहे. महापौर पदावर भाजपचाच हक्का आहे ही भूमिका मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेसमोर मांडा. पण ते करताना दोन्ही पक्षातले संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घेण्यासही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितल्याची माहिती समजते.
महापौर पदाचा पेच सोडवण्यासाठी दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समजते. शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे, भाजप नेते अमित साटम यांची दिल्लीत बैठक होणार आहे. यात महापौर पद आणि स्थायी समितीबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदाचा पेच दिल्लीत सुटण्याची शक्यता आहे.











