पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क आणि खराडीच्या इऑन आयटी पार्कमुळे पुणे ‘आयटीनगरी’ म्हणून ओळखले जाते. मात्र, सातत्याने खंडीत होणारा वीजपुरवठा, खराब रस्ते आणि नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने ‘आयटीयन्स’ला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आयटीनगरी’ची ओळख टिकवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासह सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी ‘आयटीयन्स’नी करतात. हाच मुद्दा उपस्थित करत ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूरांनी उमेदवारांकडून वाहतुक सुधारणा, ग्रीन डेटा सेंटर, कार्यालये आणि महिला सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
आयटीनगरी’च्या सक्षम करण्यासाठी शिकारपूरांनी काही महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले. सॉफ्टवेअर निर्यातीत पुण्यातील आयटी पार्क आघाडीवर आहेत. उद्योग-व्यवसायाचे जाळे मजबुत करण्यासाठी वाहतुक-दळणवळणाच्या साधनांसह वीज, पाणी आणि स्वच्छतेसारख्या मुलभूत सुविधा सक्षम असणे गरजेचे असते. मात्र, हिंजवडी आयटी पार्कमध्ये खंडीत झालेल्या वीजपुरवठ्याने तेथील पायाभुत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला.
आयटी पार्कमध्येच पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याने शहराची आयटीनगरी म्हणून ओळख टीकवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे दिपक शिकारपूरांसारख्या तज्ज्ञांनी शाश्वत नागरी विकासाची पावले उचलण्याचा पर्याय सुचवला आहे. निवडणुक जिंकल्यानंतर उमेदवारांनी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय विमानतळ : जगाबरोबर संपर्क साधण्यासाठी पुण्याचे स्वतंत्र आणि अद्ययावत आंतरराष्ट्रीय विमानतळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक आहे.
‘ग्रीन डेटा सेंटर्स’ : पर्यावरणाशी समतोल राखत काम करण्यासाठी सौर ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवर आधारित ‘ग्रीन डेटा सेंटर्स’ उभारण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
महिला सुरक्षा : हिंजवडी आणि खराडी येथील आयटी पार्क परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘सीसीटीव्हीं’चे जाळे, नियमित पोलीस गस्त आणि पथदिव्यांची दर्जेदार व्यवस्था करणे गरजेचे आहे.
परदेशी वकिलाती आणि व्यापार कार्यालये : पुण्यात परदेशी वकिलाती (कंन्सल्टंट) आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिनिधी कार्यालये सुरू करण्यासाठी पाठपरावा करणे गरजेचे आहे.











