छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे हे निवडून आल्यानंतर आता मंदिरातून अंमलीपदार्थाची पुडी मिळेल असे आमदार तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर तुळजापूरच्या पुजारी मंडळाने आक्षेप घेतले आहेत. केवळ एवढेच नाही तर गुन्हेगारी स्वरुपाची तुळजापुरातील भवानी मंदिराच्या प्रवेशव्दाराचे छायाचित्र प्रकाशित करण्यास मज्जाव करावा, अशी विनंती पुजाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी जाहीर सभेत केलेली वक्तव्ये धार्मिक, अवमानकारक, बदनामीकारक आणि सार्वजनिक शांततेस धोका निर्माण करणारी आहेत. त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या श्रध्दा, कायदा व सुव्यवस्था तसेच समाजहितास बाधा पोहचविण्याऱ्या आहेत. त्यामुळे सावंत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवे दनावर किशोर गंगणे, संदीप केवडकर, महेश खंदारे, अमर हंगरगेकर, मनोज गवळी, सत्यम साठे, स्वप्नील भोसले, श्रीकृष्ण साळुंखे, विशाल गंगणे, किरण शिंदे, नितीन साठे, रवीं ढवळे, दिगंबर जाधव आदी पुजारी बांधवांची स्वाक्षरी आहे.
तानाजी सावंत पुन्हा वादात
परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये तानाजी सावंत यांच्यावरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती. तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्यात एकाकी पडले आहेत.परंडा मतदारसंघात अगदी भारतीय जनता पक्षही सावंत विरोधी आघाडीमध्ये सहभागी होता. राणाजगजीतसिंह पाटील यांनी विनोद गंगणे यांना नगराध्यक्ष पदाची उमदेवारी दिली असल्याने सावंत याचे ड्रग्ज् पुडी बाबतचे वक्तव्य पाटील विरोधी मानले जात आहे. पुजारी मंडळाच्या या निवेदनामुळे सावंत पुन्हा वादात सापडले आहेत.











