April 23, 2026 5:20 pm

शेतकरी कुटुंबातील लहान मुलावर बिबट्याचा हल्ला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. बिबट्यांचे मानवावर हल्ले वाढले आहेत. आता असेच एक उदाहरण समोर आले आहे. एका गावातील आठ वर्षांच्या मुलावर अचानक बिबट्याने झडप घातली. त्याची मान पकडून बिबट्या त्याला उचलून नेऊ लागला. त्यावेळी मुलाच्या वडिलांनी दुचाकीवर मोठमोठ्याने हॉर्न आवाज वाजवत पाठलाग सुरू केला. त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. यात मुलाच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीला छिद्र पडले. अखेर या मुलाने मृत्यूशी दिलेली झुंज यशस्वी ठरली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात ही घटना घडली. शेतकरी कुटुंबातील या लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने त्याची मान पकडली आणि त्याला उचलून नेऊ लागला. त्याच्या वडिलांनी हे पाहिले आणि तातडीने दुचाकीवरून बिबट्याचा पाठलाग सुरू केला. ते दुचाकीचा हॉर्न वाजवत बिबट्याचा पाठलाग करीत होते. अखेर बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाला तात्काळ स्थानिक दवाखान्यात दाखल केले. दवाखान्यात त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील उपचारांसाठी पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

 

याबाबत केईएम हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. आनंद आलुरकर म्हणाले की, बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुलाच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होती. त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीला छिद्र पडले होते. त्यामुळे त्या ठिकाणी फुगवटा तयार झाला होता. यामध्ये धमनीची भिंत कमकुवत होऊन फुगवटा निर्माण होतो आणि त्यातून जीवघेणा रक्तस्त्राव होण्याचा धोका निर्माण होतो. या स्थितीचे डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी या तपासणीद्वारे निदान करण्यात आले. मुलावर कॅरोटिड स्टेंटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मेंदूच्या धमनींच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केली जाणारी बिनटाक्याची शस्त्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जांघेतील धमनीतून केली जाते. स्टेंटिंगसाठी ‘कव्हर्ड स्टेंट ग्राफ्टचा’ वापर करून धमनीतील छिद्र बंद करण्यात आले. या मुलाला उपचारानंतर दोन दिवसांतच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!