महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंग रोड अधिकाऱ्यांनी पोलिस बळाचा वापर करून रिहे (ता. मुळशी) येथील शेतकरी विलास शिंदे यांचे घर आणि गोठा जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता.२२) घोटावडे फाटा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. कोणतीही पूर्वसूचना किंवा मोबदला न देता ही कारवाई केल्याचा आरोप करत मुळशीतील शेतकऱ्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
रिहे येथील पशुपालक शेतकरी विलास शिंदे यांचे राहते घर, जनावरांचा गोठा आणि कुक्कुटपालन शेड प्रशासनाने बळाचा वापर करून पाडून टाकले. या कारवाईमुळे शिंदे यांचे संपूर्ण कुटुंब आणि पशुधन उघड्यावर आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटले असून, बुधवारी झालेल्या आंदोलनात विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी विलास शिंदे यांनी रिंग रोडचे कार्यकारी अभियंता विशाल भोईटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची आणि जमिनीचा मोबदला तातडीने देण्याची मागणी केली. आंदोलनास उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, सभापती मंदा शेळके, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे यांनी शेतकऱ्याला तातडीने भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. बावधन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
रिहे गावातील पशुपालक शेतकरी विलास शिंदे यांना रिंग रोडच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस व मोबदला न देता कुक्कुटपालन शेड, गायीचा गोठा व घर चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आले आहे, त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब बेघर आहे. त्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करीत आहोत.










