पुणे : पुणे शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या निगडे येथील शेतातील पाणंद रस्ता अडवण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही व्यक्तींकडून वैयक्तिक स्वार्थापोटी आणि हेतुपुरस्सर हा पाणंद रस्ता बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावठाणाच्या उत्तर दिशेला डोंगराच्या कडेला असलेला हा पाणंद रस्ता परिसरातील अनेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतीकामासाठी ये-जा, जनावरांची वाहतूक तसेच गायरानावर चरायला जाणाऱ्या गुरांसाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, गायरानावर जाणाऱ्या जनावरांनाही या प्रकारामुळे त्रास सहन करावा लागत असून संबंधित शेतमालकांना आपल्या शेतात पोहोचणे कठीण झाले आहे. डोंगरकडेला असलेल्या या मार्गाला पर्यायी रस्ता नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे लेखी निवेदन सादर केले असून संबंधित पाणंद रस्त्याची अधिकृत मोजणी करून हद्द कायम करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच रस्त्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून मार्ग पूर्ववत खुला करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यालगतच्या ग्रामीण भागात जमिनींच्या वाढत्या किमतीमुळे पाणंद रस्ते, गायरान आणि सार्वजनिक मार्गांवर अतिक्रमणाचे प्रकार वाढत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.











