पुणे (आरंभ पर्व) :“पोलिसांनी आपलं आरोग्य सांभाळलं तरच शहर सुरक्षित राहणार,” या भावनेतून डॉ. अस्मिता ताई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तसेच वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पुणेरी सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिवसरात्र शहराच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा असणारा पोलीस कर्मचारी स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. हीच बाब लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शंभरहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. बीपी, ईसीजी, शुगर, उंची-वजन, हाडांची तपासणी तसेच त्वचारोग तपासणी अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन व योग्य सल्ला दिला.
कार्यक्रमाला एसीपी विजय कुंभार, एसीपी राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जीने तसेच क्राईम पीआय गजानन चोरमुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी आंबेगाव पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. पोलीस विभागासाठी अशा प्रकारचे उपक्रम आवश्यक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या आरोग्य शिबिराचे आयोजन सारथी रुग्णहक्क जनसेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष दिपक हरिभाऊ चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यासाठी अनिल चौघुले, सारिका लोणकर, कुलदीप नाईक नवरे, पद्मजा गव्हाणे, हरिभाऊ दळवी आणि अनिता चौघुले यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच या शिबिरासाठी जीवनधारा मल्टिपल स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले. सामाजिक बांधिलकी जपत पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत असून, “फक्त वाढदिवस साजरा न करता समाजासाठी काहीतरी देणं,” हीच खरी पुणेरी संस्कृती असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.











