पुण्याच्या राजगड तालुक्यातील घिसर गावात हळदी समारंभ आटोपून परत येत असताना मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने एकच खळबळ उडाली. वऱ्हाडी स्वता:चा बचाव करण्यासाठी धावाधाव करू लागले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात नवरा-नवरीसह नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत इतर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले त्यामुळे वऱ्हाडी वाचले. पण या घटनेनं सर्वांचीच तारांबळ उडाली.
समोर आलेल्या माहितीनुसार, घिसर येथील संकेत शिंदे आणि संध्याराणी धिडले यांचा विवाह सोहळा आज पार पडणार होता. त्याआधी गावातील जुगाई देवी मंदिरात पारंपरिक हळदी समारंभ पार पडला. सकाळी सुमारे दहा वाजता नवरा-नवरी आणि नातेवाईक मंदिरात गेले होते. विधी पूर्ण करून सर्वजण पायवाटेने परतत असताना जंगल परिसरातील झुडपांमध्ये असलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला.
या घटनेत सुमारे वीस ते पंचवीस जणांवर मधमाशांनी झडप घातली. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या नऊ जणांना लग्नासाठी आलेल्या वाहनांमधून तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे.











