April 23, 2026 3:21 pm

राष्ट्रीय महामार्गावर गटाराच्या कामात अडथळे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वर्सोवा ते शिरसाड दरम्यान ३३ किलोमीटर लांबीच्या गटार बांधणीचे काम हाती घेतले आहे.

मात्र, मालजीपाडा आणि ससूनवघर परिसरात असलेल्या ‘रेडी मिक्स काँक्रिट’ प्लांटच्या वाहनांच्या वर्दळीमुळे या कामात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. काही वाहनचालक प्राधिकरणाने गटारासाठी खोदलेले खड्डे चक्क बुजवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे यंदाही महामार्गावर पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून मुंबई, ठाणे, वसई विरार, मिरा-भाईंदर, पालघर, गुजरात अशा विविध भागांतील वाहनांची वर्दळ सुरू असते. मागील काही वर्षांपासून या महामार्गावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत.महामार्गालगत झालेले मोठ्या प्रमाणावरील माती भराव आणि नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून दरवर्षी पूरस्थितीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या पूरस्थिती वर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.

याच पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणाकडून वर्सोवा ते शिरसाड फाटा या ३३ किलोमीटर पर्यंत गटार बांधणीचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत जवळपास ४० टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. आता पावसाळा तोंडावर असल्याने आता हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र महामार्गाला लागूनच सिमेंट काँक्रिटी प्रकल्प ( आरएमसी)आहेत. त्यात ये जा करणाऱ्या वाहनांची सातत्याने वर्दळ सुरू असल्याने गटार बांधणीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः मालजीपाडा व ससूनवघर भागात हा प्रकार अधिक दिसून येत आहे. बांधणीचे काम केल्यानंतर लगेच त्यावरूनही वाहने चालविली जातात तर काही ठिकाणी गटार बांधणीसाठी खोदलेले खड्डे ही बुजविले जात आहेत. त्यामुळे काम कसे पूर्ण करायचे असा प्रश्न प्राधिकरणापुढे उभा राहिला आहे. काही ठिकाणी खड्ड्यात आरएमसीचे टाकाऊ काँक्रिटचा माल ही त्यात टाकून दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे.याबाबतची तक्रार वरिष्ठ अधिकारी, महापालिका प्रशासन व पोलीस यांच्याकडे केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचते त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होत असते. काही वेळा प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला ही सामोरे जावे लागते. जर पावसाळ्या आधी पाणी निचरा होण्यासाठी मार्ग तयार झाले नाहीत तर यंदाही प्रवाशांना पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

महामार्गावर पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी गटार बांधणीचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत काम करताना आरएमसी वाहनांची वर्दळ, गटार बांधणीचे खड्डे बुजवणे असे प्रकार घडत असल्याने अडथळे येत आहेत. याबाबत आता वरिष्ठ स्तरावर तक्रार केली जाईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!