April 23, 2026 3:33 pm

*तेलंगणामधील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा तीव्र निषेध

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची जाणीवपूर्वक विटंबना व तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यासह देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ पतित पावन संघटना, पुणे शहरच्या वतीने महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी संघटनेचे शहराध्यक्ष श्री. स्वप्निल नाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत सांगितले की, “महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे वैचारिक आधारस्तंभ आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणे म्हणजे कायदा, संविधान आणि सामाजिक सलोख्यावर थेट हल्ला करण्यासारखे आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.”

तेलंगणा राज्यातील या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही अटक झाल्याची माहिती माध्यमांतून समोर आली असली, तरी अद्याप आरोपींची नावे व तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. तपासात पारदर्शकता न ठेवणे ही बाब गंभीर असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.

या प्रकारामुळे भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 153A (दोन गटांत वैमनस्य निर्माण करणे), कलम 295 व 295A (महापुरुषांच्या स्मृतींचा अपमान करून धार्मिक व सामाजिक भावना दुखावणे), कलम 504 (जाणीवपूर्वक अपमान), कलम 505 (द्वेष व असंतोष पसरवणे), कलम 427 (सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान) तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 अंतर्गत हा गंभीर व दखलपात्र गुन्हा ठरतो. आवश्यक असल्यास कट रचण्याबाबत कलम 120B लागू करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

पतित पावन संघटना, पुणे शहरच्या वतीने केंद्र व राज्य प्रशासनाकडे पुढील ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत –

🔹 या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करण्यात यावी.

🔹 मुख्य आरोपी, सहआरोपी, सूत्रधार व सहाय्यकांवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करावी.

🔹 तपासाची व कायदेशीर कारवाईची माहिती सार्वजनिक पातळीवर पारदर्शक ठेवावी.

🔹 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक व कायदेशीर प्रक्रियेनुसार पुनःप्रतिष्ठापना करावी.

🔹 भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था राबवावी.

“जर अशा समाजविघातक कृत्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर समाजात द्वेष, असंतोष व अराजकता वाढण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा होईल, याची खात्री करावी,” असेही श्री. स्वप्निल नाईक यांनी ठामपणे सांगितले.

या निषेध आंदोलनावेळी मनोज पवार, संतोष शेंडगे, स्वप्निल आंग्रे, योगेश वाडेकर, राजाभाऊ रजपूत, विजय क्षीरसागर, राजाभाऊ कारकूड, अमृता ताई देवकर, सौरभ पवार, अशोक परदेशी, राहुल नाईक, दीपक भोंडवे, सतीश मरळ, महेश बलवार, विश्वास शेवाळे, संदीप साका, योगेश परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!