जादा परताव्याचे आमिष दाखवून टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांनी राज्यभरातील तब्बल ११ हजार गुंतवणूकदारांची सुमारे १२०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोमवारी ठाणे न्यायालयात मोठा तणाव निर्माण झाला. अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येताच संतप्त गुंतवणूकदारांनी थेट न्यायालयाच्या आवारातच आरोपींना घेरण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी अटकेत असलेले कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम आणि नेहा नार्वेकर यांना न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात २०१९ साली टीडब्ल्यूजे असोसिएटेड प्रा. लि. कंपनीची स्थापना करण्यात आली होती. समीर नार्वेकर, अमित बालम आणि नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपकंपन्या सुरू केल्या. कंपनी शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा १० टक्के नफा कमावते, त्यापैकी ४ टक्के नफा गुंतवणूकदारांना परतावा म्हणून दिला जाईल, असे आमिष दाखवण्यात आले होते.
सुरुवातीच्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना नियमित परतावा देण्यात आल्याने कंपनीवर विश्वास वाढला. अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींनाही या योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे अल्पावधीतच राज्यभरातील सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांनी कंपनीत सुमारे १२०० कोटी रुपये गुंतवले.
मात्र मागील वर्षभरापासून गुंतवणूकदारांना परतावा मिळणे अचानक बंद झाले. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही गुंतवणूकदारांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम, संकेश घाग तसेच खारघर येथील विभाग व्यवस्थापक सागर कदम आणि वागळे इस्टेट येथील विभाग व्यवस्थापक सौरव बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू करण्यात आला.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त निलीमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांच्या पथकाने २९ जानेवारी रोजी समीर नार्वेकर व अमित बालम, तर ३० जानेवारी रोजी नेहा नार्वेकर हिला अटक केली होती.
९ फेब्रुवारी रोजी आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. ही माहिती मिळताच मोठ्या संख्येने गुंतवणूकदार पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर तसेच न्यायालय परिसरात जमा झाले. आरोपींना न्यायालयातून बाहेर काढताना संतप्त गुंतवणूकदारांनी न्यायालयाच्या आवारात प्रवेश करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला.
या घटनेमुळे पुन्हा एकदा जादा परताव्याच्या आमिषाने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











