इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या जिवावरील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ४८ क्रमांकाच्या वितरिकेच्या दुरुस्तीस सुरुवात केली आहे.
सुमारे १४ किलोमीटर लांबी असलेल्या या वितरिकेची महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी सुमारे ९.७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याने, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
तालुक्यातील कळस, पिलेवाडी, डाळज या गावांतील सुमारे ८६४ हेक्टर क्षेत्र ४८ क्रमांकाच्या वितरिकेच्या माध्यमातून सिंचित होणे अपेक्षित आहे. १४ किलोमीटर लांबी असलेल्या या वितरिकेची निर्मिती झाल्यापासून अद्यापपर्यंत शेवटच्या टोकाला पाणी पोचले नसल्याचे शेतकरी सांगतात. यासाठी अनेकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर या वितरिकेचे ठराविक अंतरात अनेकदा किरकोळ दुरुस्तीचे काम झाले. मात्र लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी पोचविण्यात पाटबंधारे विभाग सपशेल अपयशी ठरला. परिणामी वितरिकेच्या माध्यमातून केवळ ५ ते ७ टक्के क्षेत्र सिंचित होत होते. यामुळे या वितरिकेच्या दुरुस्तीच्या कामास प्राधान्य देण्यात आले आहे.
वितरिकेच्या लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा पाटबंधारे विभागाचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने सध्या ४८ क्रमांकाच्या वितरिकेचे मातीकाम, काँक्रीटचे अस्तरीकरण व वितरिकेवरील निवडक बांधकाम दुरुस्ती करण्यात येणार आहे. सुरुवातीला यंत्राच्या साह्याने करण्यात येणारे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची गळती थांबविणे बऱ्यापैकी शक्य होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. यामुळे पाटबंधारे विभागाकडून टप्प्या टप्प्याने कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. सुरुवातीला पाणीगळती रोखण्याचा प्रयत्न असून, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचविण्याचा मानस आहे. यातून लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.











