अंबाजोगाई शहरातील रविवार पेठेतील बाराभाई गल्ली परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा अंबाजोगाई पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत अवघ्या काही दिवसांत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी काझी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन (रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) यांच्या बंद घरात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे १.२५ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी घरातील चार लाख रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ११ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर फिर्यादींनी तत्काळ अंबाजोगाई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदारांची माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.
या तपासादरम्यान पठाण मोहम्मद रियाज खान (वय २५, रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई) आणि सलमान मुस्तफा शेख (वय ३१, रा. झारे गल्ली, अंबाजोगाई) या दोघांना शनिवारी (दि. ७) अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. सदर कारवाई अंबाजोगाई पोलिसांच्या तत्परतेचे व कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.











