शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची तब्बल 10 लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अधिकारी हे भांडुप परिसरात वास्तव्यास असून मध्य रेल्वेमध्ये सिनिअर इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईल फोनवर आलेल्या एका संदेशातून त्यांना एका व्हॉट्सॲप/टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. सदर ग्रुपमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूक, नफा, ट्रेडिंग टिप्स याबाबत सतत चर्चा सुरू होती.
ग्रुपमधील सदस्यांनी शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळत असल्याचे दाखवत विश्वास संपादन केला. या चर्चांवर विश्वास ठेवून तक्रारदार अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तींच्या सांगण्यावरून काही मोबाईल अॅप्स डाऊनलोड केली. त्यानंतर त्यांनी शेअर ट्रेडिंगसाठी विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण 10 लाख 75 हजार रुपये ट्रान्स्फर केले.
संबंधित अॅप्सवर गुंतवणुकीवर 17 लाख रुपयांहून अधिक नफा झाल्याचे दाखवण्यात येत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. मात्र, जेव्हा त्यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तांत्रिक कारणे, अतिरिक्त शुल्क आणि विविध सबबी सांगत रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार अधिकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवून बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल क्रमांक, अॅप्स व डिजिटल ट्रेल यांचा तपास सुरू केला आहे.
सायबर पोलिसांकडून नागरिकांना सोशल मीडियावर किंवा मेसेजद्वारे येणाऱ्या शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो किंवा जलद नफ्याच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनी व अॅपची खातरजमा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.











