April 23, 2026 3:54 pm

*कौशल्ये आत्मसात करणे हाच यशाचा मार्ग : डॉ. आनंद देशपांडे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण संगणकाशी नव्हे तर व्यक्तींशी स्पर्धा करत आहोत. नोकऱ्या किंवा कामाच्या संधी कमी झालेल्या नसून, योग्य कौशल्ये नसल्यामुळे संधी हुकत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानातील बदल ओळखून त्यानुसार नवीन कौशल्ये आत्मसात केल्यास करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध होतात, असे प्रतिपादन ‘पर्सिस्टंट सिस्टीम’चे संस्थापक-अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी केले.

‘जनसेवा फाउंडेशन’तर्फे गुरुवारी (ता. ५) आयोजित ‘मीट द स्टॉलवर्ट – भेटू या एका दिग्गजाला’ या कार्यक्रमात डॉ. देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर झालेल्या प्रकट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता आता पर्याय नाही, गरज आहे

डॉ. देशपांडे म्हणाले की, जशी डिजिटल साक्षरता नसलेली व्यक्ती आज निरक्षर समजली जाते, त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयी माहिती नसलेली व्यक्ती येत्या काळात निरक्षर ठरेल. त्यामुळे AI ही संकल्पना आता पर्याय नसून अपरिहार्य बनली आहे. AI च्या वाढत्या वापरामुळे काही मूलभूत कौशल्ये कमी वापरात जातील, हे खरे असले तरी त्याचवेळी नवीन, अधिक सर्जनशील व उच्च दर्जाची कौशल्ये आत्मसात करण्याची संधीही निर्माण होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्सिस्टंट ही केवळ कंपनी नाही, तर एक ध्यास : डॉ. माशेलकर

ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी डॉ. देशपांडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, पर्सिस्टंट ही केवळ एक कंपनी नसून ती दूरदृष्टीतून साकारलेली एक ध्यासपूर्ण संकल्पना आहे. त्यांनी व्यवसायाच्या चौकटीपलीकडे जाऊन नवोन्मेषाला चालना दिली आणि नव्या कल्पनांना नेहमीच वाव दिला, असे माशेलकर यांनी नमूद केले.

पारदर्शकतेमुळेच कर्मचारी संकटातही साथ देतात

कंपनी उभारताना कर्मचाऱ्यांसमोर एक स्पष्ट ध्येय ठेवणे आवश्यक असल्याचे सांगताना डॉ. देशपांडे म्हणाले, १९९० च्या दशकात टेलिफोन कनेक्शन मिळणेही कठीण होते आणि साधा ई-मेल तपासण्यासाठी मला मुंबईला जावे लागत होते. मात्र, कंपनीच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शकता ठेवल्यास ते संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, हा अनुभव मला कोव्हिड काळात प्रकर्षाने आला, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, सचिव मीना विनोद शहा, खजिनदार राजेश शहा, सोनाली आनंद देशपांडे, नितीन कोठारी, कांचन श्रॉफ यांची उपस्थिती होती.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे संचालक दीनानाथ खोलकर यांनी मुलाखतीद्वारे डॉ. देशपांडे यांच्याशी संवाद साधला. प्रास्ताविक डॉ. विनोद शहा यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. जे. पी. देसाई यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!