उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे हवेची गुणवत्ता सुधार कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विकासक, ठेकेदारांनी आपले गृहप्रकल्प, रस्ते कामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.
अन्यथा न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी कल्याण डोंबिवली पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी शहरातील विकासक, रस्ते ठेकेदार आणि इतर बांधकाम व्यावसायिकांना दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दररोज धोकादायक पातळीवर पोहचत आहे. त्याची गंभीर दखल उच्च न्यालयाने घेतली आहे. न्यायालयाने एमएमआर विभागातील सर्व महापालिकांना आपल्या शहरांमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उच्च गुणवत्तेचा राहील यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. या निर्देशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी कल्याण, डोंबिवली शहरातील विकासक, एमसीएचआय या विकासक संस्थेचे सदस्य आणि शहराच्या विविध भागात सीमेंट रस्ते उभारणीची कामे करणारे रस्ते ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत कल्याण डोंबिवली शहरातील हवेचा गुणांक उत्तम राहील यादृष्टीने प्रत्येक विकासक, ठेकेदाराने काळजी घ्यावयाची आहे. आपल्या गृहप्रकल्पाच्या परिसरातील रस्त्यांवर, गृहप्रकल्पाच्या ठिकाणी धुळीचा उधळा होणार नाही यासाठी पाणी मारण्याच्या सूचना केल्या आहेत.
ठेकेदारांना तंबी
कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात एमएमआरडीएकडून सीमेंट रस्ते बांधणीची, या रस्त्यांच्या बाजुला गटारे बांधणीची कामे सुरू आहेत. ही कामे करताना तो रस्ता आणि परिसरात धूळ उडणार नाही याची काळजी संबंधित ठेकेदाराने घ्यावयाची आहे. न्यायालयाच्या हवा गुणवत्ता सुधार निर्देशाचे पालन केले नाहीतर संबंधित रस्ते ठेकेदारांंवर कारवाई केली जाईल, असे लोकरे यांनी बैठकीत सांगितले.
धुळीचा उधळा
कल्याण डोंबिवली शहरात सीमेंट काँक्रीटची कामे सुरू आहेत. ही कामे करताना रस्त्यांवर ठेकेदारांकडून आवश्यक तेवढे पाणी मारले जात नाही. पाणी मारण्याचा फक्त देखावा केला जातो. या कामांवर एमएमआरडीेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे सीमेंट काँक्रीट रस्ता एका आठवड्यात ठेकेदाराकडून उरकला जात आहे. या रस्त्यांवर पुरेसे पाणी न मारल्याने सीमेंटचा धुरळा उडून नागरिकांचे आरोग्य बिघडली आहेत. अनेक विकासक जुन्या इमारती पाडताना चोहोबाजुने ताडपत्री न लावता इमारती पाडतात. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरते. अशा इमारती पाडताना त्या ठिकाणी पाण्याचा मारा चालू ठेवावा, अशा सूचना लोकरे यांनी केल्या आहेत.
बेकायदा चाळींवर नजर
टिटवाळा अ प्रभाग आणि डोंबिवली पश्चिम ह प्रभाग हद्दीत बेसुमार बेकायदा चाळींची कामे सुरू आहेत. टिटवाळा बल्याणी, बनलेी भागात टेकड्या, डोंगर तोडून बेकायदा चाळी उभारल्या जात आहेत. या बेकायदा कामांच्या ठिकाणी कमीत कमी पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे या बेकायदा चाळींच्या परिसरात चोवीस तास धुळीचे लोट पसरलेले असतात. याठिकाणी पर्यावरण विभागाने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.
न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पालिकेने हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारणा आणि धूळ मुक्त शहराचा उपक्रम सुरू केला आहे. विकासक, रस्ते ठेकेदारांनी पालिकेने दिलेल्या निर्देशाप्रमाणे धूळ मुक्त शहरासाठी पुढाकार घ्यायचा आहे. निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.











