राज्य परिवहन महामंडळ (एसटी) मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर अखेर तोडगा निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने एसटी महामंडळाला डिसेंबर २०२५ महिन्याची प्रतिपूर्ती व सवलतमूल्याचा फरक म्हणून ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीने एसटी महामंडळाला प्रतिपूर्तीची रक्कम मिळत होती. या निधीतून महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न नियमितपणे सोडवला जात होता. मात्र, २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना विमान उतरताना झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याने अर्थ खात्यातील काही कामे प्रलंबित राहिली होती.
त्यामुळे एसटी महामंडळाला प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत मिळेल की नाही, तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा होणाऱ्या ७ तारखेला होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याची सूत्रे स्वतःकडे घेत एसटी महामंडळाला दिलासा दिला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, पुणे व बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तसेच क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक विकास व औकाफ ही खाती त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. मात्र, अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व्हावे यासाठी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाला डिसेंबर २०२५ महिन्याचे सवलतमूल्य व फरकाचा हप्ता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रतिपूर्तीची रक्कम वेळेत न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर देणी व दैनंदिन खर्च भागवताना महामंडळास अडचणी येत होत्या. अखेर शासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षातील लेखाशिर्षातून ४०० कोटी रुपयांचा बिनशर्त निधी मंजूर केला आहे.
एसटी महामंडळातर्फे प्रवाशांसाठी सुमारे ३० विविध सवलत योजना राबविल्या जातात. यामध्ये महिलांना सर्व बस सेवांमध्ये ५० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, अंध व अपंग व्यक्तींना साध्या व निमआराम बस सेवांमध्ये ५० टक्के तसेच शिवशाही बस सेवांमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांना साध्या बस सेवांमध्ये ६६.६७ टक्के सवलत, स्वातंत्र्यसैनिक व माजी तसेच विद्यमान आमदारांना मोफत प्रवास, तसेच सामान्य प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षणावर १५ टक्के सवलत दिली जाते.
या सर्व सवलतींमुळे होणाऱ्या आर्थिक तफावतीची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून दिली जाते. आता ही रक्कम वेळेत मिळाल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.











