April 23, 2026 3:46 pm

2026 पर्यंत भारताची स्वदेशी कॅन्सर लस

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारत कॅन्सरविरोधातील लढ्यात निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, 2026 पर्यंत स्वदेशी थेरप्युटिक कॅन्सर व्हॅक्सिन प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा दातार कॅन्सर जेनेटिक्स या संस्थेचे चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. प्रशांत कुमारांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना सांगितलंय. दातार कॅन्सर जेनेटिक्स या संस्थेचे चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. प्रशांत कुमार यांनी आज आपल्या परिवारासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

 

लवकरच फेज वन क्लिनिकल ट्रायलसाठी पुढे जाणार :

साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. प्रशांत कुमार म्हणाले की, सध्या आम्ही कॅन्सरवरील पर्सनलाइझ्ड, सेल-लायसेट आधारित आणि एलोजेनिक व्हॅक्सिनवर काम करीत आहोत. ही लस सध्या प्री-क्लिनिकल टप्प्यात आहे. सेल लाईन आणि प्राण्यांवर चाचण्या पूर्ण झाल्या असून, लवकरच फेज वन क्लिनिकल ट्रायलसाठी आम्ही पुढे जाणार आहोत. हा प्रकल्प यशस्वी ठरला, तर भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी लोकांना याचा फायदा होऊ शकतो.

 

आजारावर अजून खूप संशोधन करण्याची गरज :

कॅन्सर हा संसर्गजन्य आजार नसून तो शरीरातीलच सामान्य पेशींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतो. असे स्पष्ट करताना डॉ. प्रशांत कुमार म्हणाले की, एचआयव्ही, मलेरिया यांसारखे आजार बाह्य घटकांमुळे होतात. मात्र कॅन्सर शरीराच्या आतच जन्म घेतो. इतक्या प्रगत संशोधनानंतरही कॅन्सरबाबत आपले ज्ञान केवळ 30 टक्के आहे. उर्वरित 70 टक्के अजूनही अज्ञात आहे. त्यामुळे या आजारावर अजून खूप संशोधन करण्याची गरज आहे. प्रत्येक देशाचा जीनोम वेगळा असल्यामुळे कॅन्सरवरील उपचारही देशनिहाय वेगळे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणती लस सर्वोत्तम याची तुलना करण्यापेक्षा जी लस रुग्णासाठी प्रभावी, सुरक्षित, परवडणारी आणि सहज उपलब्ध असेल, तीच खरी यशस्वी ठरेल. अफोर्डबिलिटी आणि अ‍ॅक्सेसिबिलिटी हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्यांनी नमूद केलंय.

शस्त्रक्रिया आणि केमो-रेडिओथेरपीचा वापर वाढला :

कॅन्सर उपचारांची माहिती देताना डॉ. प्रशांत कुमार म्हणाले की, पूर्वी कॅन्सर म्हटलं की केमोथेरपीच डोळ्यांसमोर यायची. त्यानंतर रेडिओथेरपी, शस्त्रक्रिया आणि केमो-रेडिओथेरपीचा वापर वाढला. पुढे डीएनएतील म्युटेशन्स ओळखण्यासाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (NGS) आले आणि टार्गेटेड थेरपी शक्य झाली. आज कॅन्सर उपचार इम्युनोथेरपीच्या पुढील टप्प्यावर पोहोचलेत. इम्युनोथेरपीमध्ये शरीरातील इम्यून सिस्टीम सक्रिय करून टी-सेल्सद्वारे कॅन्सर पेशींवर हल्ला केला जातो. याचाच पुढचा टप्पा म्हणजे अ‍ॅडव्हान्स इम्युनोथेरपी. यात CAR-T सेल थेरपी, ट्युमर-इन्फिल्ट्रेटिंग लिम्फोसाइट्स आणि कॅन्सर व्हॅक्सिन यांचा समावेश होतो, असे त्यांनी सांगितले.

उशिरा निदान ही मोठी समस्या :

भारतामध्ये कॅन्सरची रुग्णसंख्या पश्चिमी देशांच्या तुलनेत कमी असली तरी मृत्यूदर जास्त असल्याचे सांगत डॉ. प्रशांत कुमार म्हणाले की, पश्चिमी देशांमध्ये कॅन्सरचे रुग्ण दुप्पट आणि तिप्पट असतील, पण तिथे स्क्रीनिंग वेळेवर होते. भारतात रुग्ण बहुतेक वेळा उशिरा, कॅन्सर मेटास्टेटिक अवस्थेत आल्यावर उपचारासाठी येतात. त्यामुळे उपचार अधिक कठीण होतात. दरवर्षी सुमारे 10 लाख नवीन कॅन्सर रुग्ण भारतात आढळतात. आपली लोकसंख्या 140 कोटी आहे. त्या तुलनेत ही संख्या कमी वाटू शकते, पण मृत्युदर चिंताजनक आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, गावागावात कॅन्सर अवेअरनेस आणि स्क्रीनिंग कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!