वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या बालेघर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भगवा कट्टा प्रतिष्ठान व रामप्रहर ग्रुप, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी पार पडला. यावेळी शाळेतील ३० गरजू विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट, स्पोर्ट शूज तसेच पौष्टिक ड्रायफ्रुट्स पॅकेट देण्यात आले. बालेघर हे डोंगराळ व दुर्गम परिसरातील गाव असून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही संस्थांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद व समाधान पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.
या उपक्रमासाठी भगवा कट्टा व रामप्रहर ग्रुपच्या वतीने श्री. भरत गांधी, श्री. अनंत बोरकर, श्री. जयवंत माने, श्री. प्रकाश सावकार, श्री. वैभव जगताप व श्री. अमित देशमाने हे पदाधिकारी स्वतः मदत साहित्य घेऊन बालेघर येथे उपस्थित होते. बालेघर शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन टपळे, उपशिक्षक श्री. संताजी जाधव व उपशिक्षिका सौ. तस्लिम काझी यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून संस्थांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही दोन्ही संस्थांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भगवा कट्टा व रामप्रहर ग्रुप हे सातारा जिल्ह्यातील विविध गरजू व अडचणीच्या ठिकाणी सातत्याने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून मदतीचा हात देत आहेत. उन्हाळ्यात पाचगणी घाट परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर पाण्याची भांडी बसवून नियमित पाणी भरणे, घाट परिसराची स्वच्छता करणे, जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक व उपयुक्त साहित्य देणे तसेच अनाथ आश्रमांना मदत करणे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थांनी आजवर यशस्वीपणे राबविले आहेत.
हे दोन्ही ग्रुप स्वर्गीय विनोद ऊर्फ भैय्या सकुंडे यांच्या दूरदृष्टीतून व नेतृत्वाखाली उभे राहिले आहेत. ते अत्यंत संवेदनशील, समाजाभिमुख व कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून संपूर्ण वाई तालुक्यात परिचित होते. गरजू, वंचित व दुर्बल घटकांसाठी निस्वार्थ भावनेने मदत करणे, युवकांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करणे आणि समाजात सलोखा व एकोपा निर्माण करणे, हे त्यांच्या जीवनकार्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. भगवा कट्टा व रामप्रहर ग्रुपची संघटनात्मक बांधणी, शिस्तबद्ध कार्यपद्धती व सामाजिक सेवेची भक्कम पायाभरणी त्यांनीच केली. कोणताही गाजावाजा न करता शांतपणे समाजासाठी कार्य करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या पश्चातही दोन्ही संस्था त्यांच्या विचारधारेनुसार व आदर्शांनुसार कार्यरत असून, त्यांनी सुरू केलेली समाजसेवेची चळवळ आज अधिक व्यापक स्वरूपात पुढे जात आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.











