April 23, 2026 6:32 pm

अजित पवारांच्या राजनितीतील अपयशामुळे पुण्याचे ‘बाजीराव’ होण्याचे स्वप्न अपूर्ण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि पीएमपी बस सेवा देण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा’ अशी टीका केली. प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी ‘थोरल्या बाजीरावाप्रमाणे मनगटात ताकत असल्याने हे करून दाखवणार’ असे प्रतिआव्हान दिले. मात्र, ‘एक अलार्म पाच काम’ हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रमुख पाच चुका केल्याने पुणेकरांनी ‘अलार्म’ न दाबल्याने अजित पवार यांचे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता बदल करून पुण्याचे ‘बाजीराव’ होण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने १६५ पैकी ११९ जागा घेत स्पष्ट बहुमत मिळवले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्या. तरीही अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला २८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसला ३९ जागा मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपने ९७ जागा मिळवून सत्ता काबीज केली. यावेळी भाजपने आणखी २२ जागा घेत निर्विवाद बहुमत मिळवले.

 

गेल्या निवडणुकीत अवघ्या नऊ जागा घेतलेल्या काँग्रेसने या वेळी पंधरा जागांवर मजल मारली. दुभंगलेल्या शिवसेनेपैकी शिवसेना (ठाकरे) गटाने एक जागा घेऊन अस्तित्व टिकवून ठेवले, तर शिवसेना (शिंदे) गटाला एकही जागा न मिळाल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक प्रचार केल्याने खरी लढत भाजप आणि ‘राष्ट्रवादी’त होणार असल्याचे स्पष्ट झाले.भाजपनेही ‘मिशन १२५’ जाहीर केले. त्यामुळे चुरस निर्माण झाली. भाजपाला हे उद्दिष्ट गाठता आले नसले, तरी ते उद्दिष्टाच्या समीप गेल्याचे स्पष्ट झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक अलार्म पाच काम’ अशी घोषणा केली. मात्र, त्यांच्याकडून पाच प्रमुख चुका झाल्याने पुणेकरांनी राष्ट्रवादीचा ‘अलार्म’ वाजवला नाही. त्यामुळे अपेक्षित यश राष्ट्रवादीला मिळू शकले असल्याचे निकालावरून दिसून आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देणे ही पहिली चूक ‘राष्ट्रवादी’च्या अंगलट आली.

 

गुंड बंडू आंदेकरची स्नुषा सोनाली आणि भावजय लक्ष्मी यांना उमेदवारी देण्यात आली. त्या तुरुंगात असतानाही निवडून आल्या आहेत. गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे, गुंड बापू नायर या दोघांना उमेदवारी देण्यात आली. हे दोघेही पराभूत झाले. हे उमेदवार राष्ट्रवादीशी आघाडी करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या सचिन खरात गटाचे उमेदवार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. मात्र, अजित पवार यांचे हे स्पष्टीकरण पुणेकरांनी मान्य केले नाही.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी दिली होती. अजित पवार यांनी मोहोळ यांनाच लक्ष्य केले. जैन बोर्डिंग जमीन प्रकरण चर्चेत राहण्यासाठी ‘जय जिनेन्द्र’ असे म्हणत मोहोळ यांना हिणवल्याचाही विपरीत परिणाम मतदानावर झाल्याचे दिसून आले आहे. ‘७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप करणाऱ्यांच्या बरोबरच सत्तेत आहे’ असे वक्तव्य करून भाजप काही स्वच्छ नाही हे दाखवण्याचा अजित पवार यांनी प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांच्या या आरोपाला पुणेकरांनी पाठिंबा दिला नसल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून ‘कारभारी बदला’ अशी हाक अजित पवार यांनी दिली. मात्र, हा भ्रष्टाचार कसा झाला, हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले नाही. त्यामुळे पुणेकरांनी अजित पवार यांच्या हाकेला ओ दिली नाही. विकास कामे करण्यासाठी थोरले बाजीराव पेशव्यांप्रमाणे मनगटात ताकद असल्याची अजित पवार यांनी केलेली स्वतःची तुलना पुणेकरांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’चा अलार्म पुण्यात जोराने वाजला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!