निवडणूक आयोगाचा अजब फतवा ! मतदानाच्या दिवशीही घरोघरी प्रचाराची मुभा; नव्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम
मुंबई :
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या, तरी राज्य निवडणूक आयोगाच्या एका नव्या आदेशामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मतदानाच्या दिवशीही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आल्याने या निर्णयावर आता सर्व स्तरातून टीकेची झोड उठू लागली आहे.
नेमका निर्णय काय?
राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार जाहीर प्रचार जरी सायंकाळी ५:३० वाजता संपला असला, तरी १५ जानेवारीपर्यंत (मतदानाच्या दिवसापर्यंत) उमेदवारांना प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन प्रचार करता येणार आहे. मात्र, या काळात पत्रक वाटप, बॅनर, फलक किंवा इतर प्रचार साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी २०१२ मधील एका आदेशाचा दाखला देत स्पष्टीकरण दिले आहे की, जाहीर प्रचार संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि एसएमएसवर बंदी राहील, मात्र प्रत्यक्ष भेटीगाठींवर कोणतीही स्पष्ट बंदी नसल्याचे त्या आदेशात नमूद आहे.
विरोधकांकडून टीकेची झोड
निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय म्हणजे आचारसंहितेची थट्टा असून, लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतदानाच्या दिवशीही वैयक्तिक प्रचाराला परवानगी दिल्याने निवडणूक प्रक्रियेची पवित्रता धोक्यात येऊ शकते, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे.
पैसे वाटपाची ‘वाट’ मोकळी?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाच्या २४ ते ४८ तास आधी सर्व प्रकारचा प्रचार पूर्णपणे थांबवण्याची पद्धत आहे. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशीही प्रचाराची मुभा दिल्याने हा निर्णय पैसे वाटप किंवा दबावाच्या राजकारणासाठी वापरला जाणार का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
या नव्या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मतदानाच्या दिवशी या सवलतीचा फायदा कोण आणि कसा घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.











