April 23, 2026 6:21 pm

मनोचिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञांची देशात कमतरता – डॉ. आनंद नाडकर्णी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- मानसिक आरोग्य ही सगळ्यांची गरज आहे. परंतु मानसिक आरोग्य शिक्षणाचा दर्जा आपल्याकडे समाधान कारक नाही. देशातील बहुतेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानसिक आरोग्य सेवांचा अभाव असून, प्रशिक्षित मनोचिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांची संख्या अत्यंत कमी आहे. १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात अंदाजे ९,००० मनोचिकित्सक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींपेक्षा ही संख्या खूपच कमी आहे. अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मनोविकरतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

 

रविवारी गांधी भवन, कोथरूड, येथे २७ वे गांधी दर्शन शिबिर संपन्न झाले. यावेळी डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मनोविकार ते मनोविकास या विषयावर विचार मांडले.

मानसोपचारातील प्रगतीचे टप्पे सांगताना डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मनोविकास शास्त्र फार पुढे गेले. सर्दी-खोकला अथवा ताप आल्यानंतर जितक्या सहजपणे आपण डॉक्टरकडे जातो, तितक्या सहजपणे तेव्हा मानसोपचार तज्ज्ञांकडे नागरिक उपचारांसाठी जात नव्हते. मानसिक विकार म्हणजे काहीतरी कलंक असल्याची भावना समाजात त्या काळातही होती. आमच्या औषधाबाबत शंका खुप असतात. मनोमारक प्रलोभने खुप आहेत. एन्झायटी मधून बाहेर पडलेल्या लोकांना अती शांतता मारक होवू शकते.

डॉ. नाडकर्णी म्हणाले की, विवेकाची काजळी हटविण्याचे आव्हान बुध्द, ज्ञानेश्वर, गांधीजी यांच्या काळातही होते आणि आजही आहे. समाज विवेकवादी बनणे आवश्यक आहे. सैनिक, खेळाडू असो की उद्योगपती मानसोपचाराचा उपयोग सर्वांना होतो. मनोविकास शास्राचा विकास समृध्द समाजासाठी, मानवी जीवन सुकर करण्यासाठी उपयोगी आहे.

फ्रेंड्स ऑफ नेचर चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संतोष ललवाणी यांनी महात्मा गांधी, सोनम वांगचुक, पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयावर विस्तृत मांडणी केली. तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधारि, ” द डे आफ्टर टुमारो” हा जागतिक स्तरावर गाजलेला चित्रपट यावेळी दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल हे होते.

संतोष ललवाणी म्हणाले की, सोनम वांगचुक हे महात्मा गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी करतात. त्यांनी लडाख परिसरात केलेले विविध प्रयोग पाहिले की त्याची प्रचिती येते. वांगचुक यांनी गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी करत लडाख मधील समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न केला. गांधींजी म्हणत, आधी करुन पाहिले आणि मग सांगितले. वांगचूक यांनी त्यांचे विचार कृतीत आणून, शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली. गांधींजी हे काळाच्या पुढे जावून विचार करणारे होते.

सोनम वांगचुक हे गांधीजींच्या विचारधारेवर आधारीत काम कसे करत आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करतात याची अनेक उदाहरणे देताना संतोष ललवाणी म्हणाले की, दोघेही सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालणारे आहेत. दोघांनी उपोषण केलेली आहे. दोघांनीही पदयात्रा काढली, तुरुंगवास भोगावा लागला.

ललवाणी म्हणाले की, गांधीजींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. गावामध्ये कोणत्या प्रकारचा विकास करावा यासंदर्भात ठरवण्याचा अधिकार गावातील लोकांना असायला हवा. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि शिक्षण मिळावं या दोन मुख्य मागण्या घेवून वांगचुक यांनी जनआंदोलन उभे केले. त्यांच्या विकासाचा पाया हा नीतिमत्ता, चारित्र्य आणि सचोटी यावर आधारित असावा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकास विकेंद्रीत, निसर्गाच्या मर्यादेत राहून करावा,शोषण करून नाही, परस्परांच्या सहकार्याने करावा. ही गांधीजींची भूमिका घेवूनच वांगचूक यांचे कार्य सुरु आहे.

हिमालयातील पाणी पूर्ण उत्तर भारताला मिळतंय. मात्र उन्हाळ्यामध्ये तीथे पाणी टंचाई असते. महिलांना लांबून पाणी आणावे लागते. ही समस्या स्थानिक ज्ञान, सामुग्री वापरून कशी सोडवायची याचा प्रयोग वांगचूक यांनी केला. साधे शास्र, साधे प्रयोग यातून लडाख भागात जो पाणी टंचाईचा प्रश्न होता तो अतिशय कमी खर्च, कोणतेही मोठे तंत्र, मशिनरी न वापरता आईस स्तुप हा प्रयोग लडाख भागातील जलसमस्या सोडविण्यासाठी उपयोगी पडला. एका स्तुपात दहा लक्ष पाणी साठवले. तिथे त्यांनी पाचहजार झाडे लावून जगवली. स्थानिक सामुग्री, तंत्रज्ञानाचा वापर करून तेथील प्रश्न सोडविण्याचा हा प्रयोग होता.

औद्योगीकरणाला जसा गांधीजींचा विरोध होता. तसाच वांगचुक यांचा विरोध आहे. विकासाच्या नावाखाली जे खाणकाम चालु आहे त्याला विरोध केला. हिमालयातील ती निसर्ग व्यवस्था आहे ती खुप वेगळी आहे. त्याला हानी पोहचवू नये.

चर्चासत्राच्या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक अप्पा अनारसे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख होते. दुस-या सत्राचे प्रास्ताविक निहार मुजावर यांनी केले. अध्यक्षस्थानी अन्वर राजन होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!