म्हणतात ना एखाद्या खेळाडूची खरी ताकद कठीण परिस्थितीतच समोर येते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा हेच सिद्ध करून दाखवले आहे. गोव्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या ऋतुराजने अत्यंत कठीण परिस्थितीत संघासाठी शानदार शतक झळकावले.
महाराष्ट्राची अवस्था 52 धावांत 6 फलंदाज बाद अशी बिकट असताना ऋतुराजने एका बाजूने डाव सावरला. दबावाखाली खेळताना त्याने संयम ठेवत शतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर महाराष्ट्राला केवळ सन्मानजनक धावसंख्या गाठता आली नाही, तर पाकिस्तानच्या बाबर आजमचा जागतिक विक्रम मोडण्याचाही ऐतिहासिक पराक्रम घडला.
ऋतुराज गायकवाडची 134 धावांची झुंजार खेळी
गोव्याविरुद्ध ऋतुराज गायकवाडने 131 चेंडूचा सामना करत 134 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. विजय हजारे ट्रॉफीच्या चालू मोसमातील ही त्याची सलग चौथी 50 पेक्षा अधिक धावांची खेळी ठरली. याआधीच्या तीन डावांत त्याने अनुक्रमे 124, 66 आणि 22 धावा केल्या होत्या.
हे शतक ऋतुराजच्या लिस्ट-ए कारकिर्दीतील 20वे शतक ठरले. विशेष म्हणजे लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या शतकांची संख्या अर्धशतकांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत त्याने 19 अर्धशतके झळकावली आहेत. याच डावात त्याने लिस्ट-ए क्रिकेटमधील 5,000 धावांचा महत्त्वाचा टप्पाही ओलांडला.
बाबर आजमचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5,000 धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून ऋतुराज गायकवाडने नवा विक्रम प्रस्थापित केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आजमच्या नावावर होता. बाबरने 97 डावांत 5,000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र ऋतुराजने फक्त 95व्या डावातच हा टप्पा गाठत बाबरचा विक्रम मोडला.
अडचणीतून संघाला बाहेर काढणारी कर्णधाराची खेळी
विजय हजारे ट्रॉफीतील या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. मात्र सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या 52 धावांत संघाचे सहा फलंदाज तंबूत परतले. अशा कठीण प्रसंगी कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक टोक पकडून ठेवलं. संयमी आणि जिद्दी खेळी करत त्याने शतक झळकावले आणि संघाचा डाव सावरला. त्याच्या या झुंजार शतकामुळे महाराष्ट्राने 50 षटकांत 7 गडी बाद 249 धावांचा सन्मानजनक स्कोअर उभारला.











