पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त मात्र अद्याप ठरलेला नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता असून, त्या एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बारावी आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा सुरू होत असल्याने निवडणूक प्रक्रिया राबवणे अवघड ठरणार आहे. त्यामुळे मार्च अखेरीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यातच या निवडणुकांचा मुहूर्त लागण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक आहे, तेथील निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता असून, उर्वरित जिल्ह्यांतील निवडणुका एप्रिलमध्ये होऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
नगर पंचायती व नगर परिषदांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी साधारण महिनाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे ३१ जानेवारीपूर्वी या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट संकेत देण्यात येत आहेत.











