*जेजुरी प्रतिनिधी:- जेजुरी एमआयडीसी येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज कंपनीत कार्यरत कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रीय मजदूर संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीकडून कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत असून ही बाब गंभीर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले.
किर्लोस्कर फेरस कंपनीत विविध कंत्राटदारांमार्फत मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. मात्र या कंत्राटी कामगारांना पगार स्लिप देण्यात येत नाही, किमान वेतन कायद्यानुसार वेतन दिले जात नाही, ईएसआयसी नोंदणीपत्र उपलब्ध करून दिले जात नाही. तसेच बोनस, कायद्यानुसार ओव्हरटाईम, राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांचा पगार व पगारी रजा यांपासूनही कामगारांना वंचित ठेवले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. याशिवाय कामगारांना सन्मानजनक वागणूक दिली जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी राष्ट्रीय मजदूर संघाने कामगार उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली असून मंगळवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथील कामगार उपायुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीला कंपनीतील काही कंत्राटदार व राष्ट्रीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र किर्लोस्कर फेरस कंपनीचे व्यवस्थापन जाणूनबुजून गैरहजर राहिले, ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे शिंदे म्हणाले.
किर्लोस्कर उद्योग समूहाची देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा असताना, जेजुरी येथील व्यवस्थापनाकडून होत असलेली कामगार कायद्याची पायमल्ली ही किर्लोस्कर नावाला कलंक लावणारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोळविहिरे ग्रामपंचायत हद्दीत आयोजित कामगार मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी सांगितले की,उपलब्ध ऑनलाईन माहितीनुसार कंपनीला मागील तिमाहीत सुमारे ८२ कोटी रुपये, तर वार्षिक सुमारे २४३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. असे असतानाही कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोळविहिरे गावातील अनेक शेतकऱ्यांनी या कंपनीसाठी आपली जमीन दिली असून, भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रीय मजदूर संघाकडून करण्यात आली. कंपनीने लवकरात लवकर कामगारांना न्याय दिला नाही,तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
या कामगार मेळाव्यास राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, पुरंदर तालुकाप्रमुख हनुमंत म्हस्के, माथाडी विभाग प्रमुख देवकर, कोळविहिरे गावातील प्रमुख पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.











