भराडी (ता.आंबेगाव) येथील घोडनदीच्या किनारी असलेल्या गावडेमळा जवळ दोन रोहित्र अज्ञात चोरट्यांनी मंगळवार (ता.१९) रोजी मध्यरात्री फोडली यामध्ये महावितरण कंपनीचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,ही चोरीची घटना बुधवार (ता.२०) रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
तसेच ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे कृषीपंप बंद झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे,तरी महावितरण कंपनीने तातडीने रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी भराडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
भराडी येथील घोडनदीकाठी गावडे मळा जवळ दोन रोहित्र आहेत,या ठिकाणाहून २५ ते ३० शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज पुरवठा केला जातो.सध्या थ्री फेज वीज दिवसा उपलब्ध असून रात्रीची सिंगल फेज वीज असते यामुळे थ्रीफेज बंद असल्या कारणाने वीज गेली तरी कृषीपंपाकडे रात्रीच्या वेळी कोणी शेतकरी फिरकत नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री पोलवरून दोन रोहित्र खाली पाडले आणि यामधील १०० के.व्ही रोहित्रामधील २१० आणि २०० के.व्ही मधील २४० लिटर ऑइल असे एकूण दोन्ही मधील ४५० लिटर ऑइल आणि आदी नुकसान केले यामध्ये अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती निरगुडसर वीज मंडळाचे वीजअभियंता नितेश बसारकर यांनी दिली.
चोरीची माहिती पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी महावितरण कंपनी आणि पारगाव पोलिस ठाण्यात दिली,माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी अभियंता नितेश बसारकर यांनी येऊन पाहणी केली.चोरीची तक्रार पारगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. भराडी परिसरात घोडनदी किनारी अनेक वेळा रोहित्र फोडण्याच्या घटना घडल्या आहेत तसेच शेकडो कृषी पंपाच्या केबल चोरीचा देखील घटना घडल्या असल्याचे भराडी ग्रामस्थांनी सांगितले.
पारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे म्हणाले की,भराडी येथील घोडनदी किनारी दोन रोहित्र फोडून चोरट्यांनी मोठे नुकसान केले आहे,याबाबत भराडी ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली असून चोरट्यांचा तातडीने छडा लावण्यात येईल.
निरगुडसर वीज मंडळाचे वीजअभियंता नितेश बसारकर म्हणाले की,दोन रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून या दोन्हीमधील ४५० लिटर ऑइल आणि रोहित्र नुकसान झाल्याने महावितरण कंपनीचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत पारगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.तसेच सर्व अहवाल मंचर वीज कार्यालयाला सादर करण्यात आला असून नवीन रोहित्र बसवण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.











