ऑनलाईन औषध विक्री तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलती आणि बनावट औषधांच्या वाढत्या विक्रीमुळे किरकोळ औषध व्यवसाय संकटात सापडल्याच्या निषेधार्थ बुधवार (२० मे) रोजी हवेली तालुक्यातील लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय मेडिकल बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्यामुळे दिवसभर मेडिकल दुकाने बंद राहिल्याने औषध बाजारपेठेवर शुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ तसेच ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’ यांच्या आवाहनानुसार हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरातील विक्रेत्यांनीही या आंदोलनात सहभागी होत दुकाने बंद ठेवून सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली.
काही ठिकाणी अत्यावश्यक औषधांसाठी नागरिकांची गैरसोय झाली असली, तरी नियमित औषधे घेणाऱ्या रुग्णांनी एक दिवस आधीच आवश्यक औषधांचा साठा करून खबरदारी घेतल्याचे दिसून आले.
औषध विक्रेते संघटनांनी ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय घरपोच औषध पुरवठा होत असल्याने अंमली पदार्थ आणि गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर वाढत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला. तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे छोटे दुकानदार आर्थिक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. फार्मासिस्टशिवाय औषध विक्री सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याने केंद्र सरकारने औषध विक्रीसंदर्भात कठोर आणि पारदर्शक नियम लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून औषध परवान्यांशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यात याव्यात आणि किरकोळ व्यापाऱ्यांवरील जाचक कारवाई थांबवावी, अशी मागणीही संघटनांनी केली आहे. शासनाने केवळ कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी औषध विक्रेते संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून कायमस्वरूपी आणि कायदेशीर तोडगा काढावा, अशी मागणी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.











