May 14, 2026 3:08 am

आता भर दुपारी अन् रात्रीही ‘बत्तीगुल’

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ऐन उन्हाळा आणि पाराही चाळिशीच्या घरात! उन्हाने अंगाची काहिली होत असताना शहरातील अनेक भागांत मात्र विजेचा लपंडाव सुरू आहे. भर उन्हाळ्यात कधी दुपारी, तर कधी रात्री बराच काळ वीज नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.महावितरण वीजयंत्रणेची देखभाल-दुरुस्ती खरेच नीट करते ना, वारंवार वीज जाण्याच्या घटना घडतातच कशा यांसह अनेक संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या.

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात वेगवेगळ्या भागांतून वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. वीज अचानक जात असल्याने विजेवर चालणारी उपकरणे खराब होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रभात रस्ता परिसरात मंगळवारी दुपारनंतर दोन-अडीच तास वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी केली. पौड रस्ता परिसरात तीन-चार तास आणि कोंढवा बुद्रुक परिसरात सोमवारी रात्रीपासून १६ तास वीजपुरवठा खंडित असल्याने हाल झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. सुखसागरनगर, सिंहगड रस्ता परिसरातही विजेचा लंपडाव सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले.

महापारेषणच्या कोथरूड उपकेंद्रातील वीजयंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. मात्र, पर्यायी मार्गाने परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या कोथरूड विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. महावितरणच्या यंत्रणेत बिघाड नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर, कोंढवा बुद्रुक परिसरात भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे पाच रोहित्र बंद होते. त्यामुळे या परिसरात वीजपुरवठा विस्कळीत झाला. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच सदाशिव पेठेत महावितरणच्या वीज यंत्रणेला आग लागल्याने परिसरातील चारशे ते पाचशे वीजग्राहकांचा वीज पुरवठा २५ तासांहून अधिक काळ विस्कळीत झाल्याचे समोर आले होते. कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी परिसरातील वीजग्राहकांना आठवड्यातील एक-दोन दिवस अंधारातच काढावे लागत असल्याचे चित्र आहे.

‘महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी त्या-त्या परिसरातील वीजपुरवठा काही काळ बंद करण्यात येतो. मात्र, देखभाल-दुरुस्तीची कामे खरेच करण्यात येतात का, वीजयंत्रणेत बिघाड होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घेतली जाते,’ असे सवाल नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

‘सातत्याने विस्कळीत होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन कामे करणे अवघड होते. ज्येष्ठ नागरिक, महिलांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. घरात कोणी आजारी असेल, तर त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवता येत नाहीत. फ्रीजमधील पदार्थ खराब होतात. वीज नसल्याने ऐन उकाड्यात साधा पंखाही सुरू करता येत नाही. तर, घरातून काम करणाऱ्यांना मोबाईल, लॅपटॉपला चार्ज करता येत नाही. त्यांच्या कामावरही परिणाम होतो. बऱ्याचदा, आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो,’ अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

बंद पडल्यावरच वीजयंत्रणेकडे लक्ष द्यायचे. मात्र, बिघाड होण्यापूर्वीच गुणवत्तापूर्ण देखभाल-दुरुस्ती करणे गरजेचे असते. त्यातूनही बिघाड झालाच, तर परिसरातील नागरिकांना कशामुळे वीज गेली, ती कधी येणार, हे कळवण्याची जबाबदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर असते. पण, सतत होणाऱ्या बिघाडांमुळे वीज यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे खरेच करण्यात येतात का, हे पडताळून पाहायला हवे, असे सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी नमूद केले.

‘विजेचा वापर वाढल्यामुळे यंत्रणेवर ताण येतो. एप्रिल आणि मे महिन्यात बिघाड होण्यापूर्वीची खबरदारी म्हणून देखभाल-दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. त्यासाठी काही काळ वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. बऱ्याचदा बिघाडामुळेच वीज गेली, असा नागरिकांचा गैरसमज होतो. कोंढव्यात पायाभूत सुविधा उभारण्यात काही अडचणी होत्या. मात्र, नव्याने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ अशी माहिती महावितरणच्या पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!