टक्कल, चष्मा, वेशभूषाही सर्वसाधारण असणारा युवक जात असताना समोरून आलेल्या एकाने नमस्कार केला… त्यानेही नमस्कार केला.काही तरी बोलायचे म्हणून त्या व्यक्तीने युवकाशी बोलण्याचा प्रयत्न केला अन् पुढे गेला. काही अंतरावरच चालणाऱ्या काहींना त्या व्यक्तीने खुणावताच एकाच वेळी आठ- दहा जणांनी युवकाला घेरलं अन् ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने शुभम सांगितले; पण खैरनार नाही, असे म्हणत पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला; पण पोलिस नजरेनेच त्याला हेरले होते.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना मंगळवारी (ता. १२) सकाळी नऊच्या सुमारास राजस्थान पोलिसांनी संपर्क साधत नोट पेपरफुटीतील संशयित शुभम खैरनारची माहिती दिली. काही वेळातच ‘सीबीआय’कडून शुभमचा एक फोटो अन् माहिती मिळाली. आयुक्तांनी शहर गुन्हे शाखेला फक्त शुभमचे संपूर्ण नांव कळविले आणि तातडीने अटक करण्याचे फर्मान सोडले. गुन्हे शाखेने या मोहिमेसाठी शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला सूचना केल्या.
युनिट दोनच्या पथकाला ज्याला पकडायचे तो कोण आहे, याची कोणतीही माहिती नव्हती. त्यांच्या हाती केवळ त्याचे नाव आणि सोशल मीडियावरील एक फोटो होता. युनिट दोनवे प्रभारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या पथकाला नावावरून शोध सुरू करण्याची सूचना केली. त्यावरून काही माहिती हाती लागताच पथकाने साध्या वेशात इंदिरानगर परिसरात शोधमोहीम सुरू केला.
तूच शुभम खैरनार का, असे विचारले असता ‘मी शुभम, पण खैरनार नाही… ‘असे सांगत त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुळात पथकाला हेच माहिती नव्हते, की याला का अटक केली आहे? त्यामुळे ‘पोलिसी खाक्या ‘ही देता येत नव्हता. तरीही पोलिसांची करडी नजर अन् आवाजातील जरवेने तो नरमला अन् अखेर शुभम खैरनार असल्याचे मान्य केले. पथकाने अवध्या तासा-सव्वा तासात त्याला ताब्यात घेतले होते. पथकाने वरिष्ठांना माहिती कळविली; पण तरीही वरिष्ठांनी ‘तो’ कोण हे सांगितलेच नाही…
युनिट दोनच्या कार्यालयात टीव्ही सुरू असताना त्यावर ब्रेकिंग न्यूज झळकली… ‘नीट’चा पेपर फुटला… नाशिकमधून एकाला ताब्यात…’ है ऐकून युनिट दोनच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली. त्यांनी ज्याला पकडले होते, तो सराईत गुन्हेगार नाही तर ‘नीट’चा पेपर फोडणारा होता, पथकातील सारे अंमलदार त्याच्याकडे पाहू लागले अन् तो पथकातील अंमलदारांकडे.
अकराच्या रणरणत्या उन्हात पथकाने शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे माग काढणे सुरूच होते. इंदिरानगरमध्ये गस्त सुरू असताना, टक्कल, चष्मा अन् पेहरावही शर्ट-पॅन्ट असा साध्या वेशातील पुरुष रस्त्याने जात होता. पथकातील अंमलदाराची नजर त्याच्यावर पडली; पण त्यांच्या हाती असलेला फोटो आणि समोर दिसणारा युवक ५० टक्केच साम्य दिसत होते. एक अंमलदार त्याला पाहण्यासाठी त्याच्या समोरून चालत आला. अंमलदाराने नजरेला नजर देत शुभमला स्मितहास्य करीत नमस्कार केला. त्यानेही तसाच प्रतिसाद दिला.
त्या अंमलदाराने आसपास दबा धरून असलेल्या पथकाला ‘येस… ‘चा अंगठा दाखवून इशारा केला. तसे त्याने मागे वळून त्या युवकाला ‘शुभम…’ असा आवाज दिला. तसे, युवकाने मागे वळून पाहिले. खात्री पटताच, दबा धरून असलेल्या युनिट दोनच्या पथकाने शुभमला घेरले अन् कोणतीही संधी न देता वाहनात टाकून युनिट दोनचे कार्यालय गाठले.











